मुंबई : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. त्यामुळे पदविका पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा या राखीव जागांवर प्रवेश घेण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये कल वाढतो आहे. यंदा अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीनंतर ११ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर २० हजार ५६६ जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे पुढील दोन फेऱ्यांमध्ये किती विद्यार्थी प्रवेश घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
अभियांत्रिकी द्वितीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यात ५२ हजार १४ जागा असून, या जागांसाठी यंदा ५७ हजार ८१० विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेली आहे. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला. तर १९ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी ‘उत्तम महाविद्यालय’ हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता तिसऱ्या फेरीमध्ये अपेक्षेप्रमाणे महाविद्यालय न लागल्यास या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये लागलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे. दोन फेऱ्यानंतर २० हजार ५६६ जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीला २२ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. या फेरीची गुणवत्ता यादी २६ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा जागांमध्ये घट
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या एकूण जागांच्या १० टक्के जागा आणि गतवर्षी प्रवेश न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांवर थेट दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश दिला जातो. अभियांत्रिकी अभ्यासक्रच्या दुसऱ्या फेरीसाठी २०२३-२४ मध्ये ४६ हजार १३४ जागा होत्या. त्यातील ३४ हजार ७१६ जागांवर प्रवेश झाले तर २०२४-२५ मध्ये ६० हजार २४५ जागा होत्या. यातील ४१ हजार ८९४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते, मात्र यंदा जागांमध्ये घट झाली आहे. २०२५-२६ मध्ये ५२ हजार १४ जागा आहेत. त्या जागांवर आतापर्यंत ११ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.