मुबई : पदविका अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद आणि आयटीआयच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या (पॉलिटेक्निक) प्रथम व थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत तंत्र शिक्षण संचालनालयाकडून मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. याचा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यंदा विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. मागील १० वर्षांच्या प्रवेशाच्या तुलनेत यंदा सर्वोच्च प्रवेश झाले आहेत. २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत १ लाख ७ हजार ३२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, त्याचप्रमाणे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे नवीन शैक्षणिक वेळापत्रक व सणासुदीमुळे असणाऱ्या सुट्या लक्षात घेऊन अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना उच्च व व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तंत्र शिक्षण संचालनालयला दिल्या आहेत.
त्यानुसार तंत्र शिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. तसेच बारावीनंतरच्या एचएमसीटी व सरफेस कोटिंग पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्थांमधील रिक्त जागांवर १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. प्रवेशासाठी दिलेली मुदतवाढ लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
दहावीनंतरचे पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी रोजगार व उच्च शिक्षणाचा उत्तम पर्याय ठरत असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, रोबोटिक्स यासारखे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहिमा, उद्योग क्षेत्राशी सामंजस्य करार आणि स्वयंअध्ययन मूल्यांकन यासारख्या उपक्रमांमुळे हा विक्रमी प्रतिसाद मिळत आहे.
थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठीही मुदतवाढ
आयटीआयच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर होईपर्यंत दरवर्षी पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना एक वर्ष वाट पाहावी लागत असून दरवर्षी विद्यार्थ्यांची गैरसोय होते. नुकत्याच जाहीर झालेल्या आयटीआय अभ्यासक्रमाच्या निकालामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेशाची संधी मिळावी यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.