मुंबई– वांद्रे येथे राहणाऱ्या ४० वर्षीय अपंग महिलेने राहत्या इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत ही घटना घडली. शीतल पवार असे या मृत महिलेचे नाव आहे. तिने आत्महत्या का केली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. उंच उमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून मागील ३ महिन्यातील ही ८ वी घटना आहे.

वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत शीतल पवार (४०) या पती सतीश पवार (४५) यांच्यासह १६ व्या मजल्यावरील सदनिकेत रहात होत्या. शीतल या अपंग होत्या. बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास त्यांनी अचानक १६ व्या मजल्यावरून उडी मारली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत शीतल पवार यांचे पती सतीश पवार यावेळी घरातच होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नाही.

शीतल या चालू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आत्महत्या कशी केली याच्या सर्व शक्यता खेरवाडी पोलीस तपासात आहेत. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील ३ महिन्यातील ही ८ वी घटना आहे. यापूर्वीच्या काही घटना-

२ जुलै २०२५ : कांदिवली- शिकविणीला जाण्यास सांगितल्याने १४ वर्षीय मुलाने ५७ मजली इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली.

३ जुलै २०२५ : गोरेगाव येथे राहणाऱ्या २२ वर्षीय अनंत द्विवेदी या तरुणाने राहत्या इमारतीच्या ४५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

२५ जून २०२५ : भांडुप येथे ३१ व्या मजल्यावरून उडी मारून १५ वर्षीय मुलीची आत्महत्या

१९ जून २०२५ ; साठ्ये महाविद्यालयाच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारून १९ वर्षीय संध्या पाठक या तरुणीची आत्महत्या. एकतर्फी प्रेमातून उचलले टोकाचे पाऊल.

२७ मे २०२५ : विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथे २३ व्या मजल्यावरून उडी मारून हर्षदा तांदोलकर (२५) या तरुणीची आत्महत्या

२८ मे २०२५ : गोरेगाव येथे ४५ व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीने आत्महत्या केली.

७ मे २०२५ : दहिसर येथे राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून मर्मिन मेनन (७२) ७२ वर्षीय वृध्द महिलेने आत्महत्या केली आहे. आजारपण आणि नैराश्यामुळे मेनन यांनी आत्महत्या केल्याची शक्यता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२ एप्रिल २०२५ : दादरच्या हिंदू कॉलनी येथील टेक्नो हाईटस या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून झाना सेठिया (२०) या तरुणीची आत्महत्या