मुंबई : कलात्मकतेला प्रयोगशीलतेची जोड देत प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार, तसेच नवोदित कलाकार वैविध्यपूर्ण कलाकृती सादर करीत असतात. मात्र त्यांना अनेकदा तालमीसाठी जागा मिळत नाही, तर कधी तालमीच्या जागेचे भरमसाठ भाडे परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार व नवोदित कलाकारांना प्रोत्साहन आणि उत्तेजन देण्याच्या हेतूने माटुंगा रोड (पश्चिम) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलातील तालमीसाठीच्या दालनाच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यशवंत नाट्यमंदिराच्या आवारातील तालमीच्या जागांचा वापर करण्यासाठी प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार, तसेच नवोदित कलाकारांना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे विविध नाट्यसंस्थांद्वारे एकांकिका सादर करणाऱ्या युवा कलाकारांनाही एकांकिकेची तालीम करण्यासाठी जागेच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीचा लाभ घेऊन सदर दालनात ज्या नाटकाची तालीम करण्यात येणार आहे, त्या नाटकाच्या संहितेला मिळालेले रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रायोगिक नाटक असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच सदर नाटकात काम करणारे सर्व कलाकार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य असणे बंधनकारक आहे. हे सदस्यत्व मिळविण्यासाठी आपले आधार कार्ड सादर करून नाट्य परिषदेच्या कार्यालयात अर्ज भरता येणार आहे. तरी जास्तीत जास्त संस्थांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलातील नाट्य परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘मी स्वतः प्रायोगिक रंगभूमीवर काम करून व्यावसायिक रंगभूमीकडे वळलो आहे. त्यामुळे प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार व नवोदित कलाकारांना विविध समस्या व अडचणींचा सामना करावा लागतो, याची जाणीव आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अखिल भारतीय नाट्य परिषदेने सर्वानुमते तालमीसाठीच्या दालनाच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नवोदितांना नाटकाची तालीम करणे सोयीस्कर होणार आहे. यामुळे प्रायोगिक रंगभूमीवर उत्तम कलाकृती सादर होत राहतील आणि याचा फायदा व्यावसायिक रंगभूमीलाही होईल’, असे प्रसिद्ध अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.