मुंबई : मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिवसेनेतही (शिंदे) नाराजी उफाळून आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने (शिंदे) प्रभारी विभागप्रमुखांची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर झाल्यापासून पक्षातील अनेक इच्छुकांनी उघडउघड नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. पक्षात प्रवेश करताना दिलेल्या वचनांची पूर्तता होत नसल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. तर आपल्यानंतर आलेल्यांना संधी दिल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. काही नाराज पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली नाराजीही व्यक्त केली.
मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षबांधणी, पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका, जबाबदाऱ्यांचे वाटप आदी कामांना वेग आला आहे. शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर होणारी ही मुंबई महापालिकेची पहिलीच निवडणूक असून ही निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेनेसाठी (शिंदे) ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने नुकतीच मुंबईतील विभागप्रमुखांची यादी जाहीर केली.
यामध्ये शिवसेनेतून (ठाकरे) आलेल्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र ही यादी जाहीर झाल्यापासून शिवसेनेतील (शिंदे) पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. विलेपार्ले येथील जितेंद्र जानावळे यांनी समाज माध्यमांवरून नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेत (ठाकरे) असताना आपल्याला विभागप्रमुख पद मिळाले नाही आणि इथेही मिळाले नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. त्यावर अनेक शिवसैनिक त्यांना शिवसेनेत (ठाकरे) परत येण्याचा सल्ला देत आहेत.
दरम्यान, जानावळे यांच्याप्रमाणेच पश्चिम उपनगरात अनेक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. पश्चिम उपनगरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचाही इशारा दिला होता. गोरेगाव – दिंडोशी येथील गणेश शिंदे, चारकोपचे संजय सावंत आणि जानावळे यांनी मंगळवारी शिवसेनेचे (शिंदे) मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व आपली नाराजी व्यक्त केली. शिंदे यांनी याप्रकरणी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती जानावळे यांनी दिली. दहिसर विधानसभा मतदारसंघातील काही पदाधिकारीही नाराज असून त्यांनीही सोमवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मलबार हिलमध्येही नाराजी
मलबार हिल विधानसभा मतदारसंघात प्रवीण कोकाटे यांची प्रभारी विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरूनही अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. कोकाटे गेली काही वर्षे पुण्यात राहत आहेत. त्यांना मुंबईतील एवढे मोठे पद कसे काय दिले अशीही कुजबूज सुरू आहे. तर कुलाबा मतदारसंघात माजी नगरसेवक गणेश सानप यांना विभागप्रमुख नेमले आहे. सानप हे दोन महिन्यांपूर्वीच पक्षात आले आणि त्यांना हे पद दिल्यामुळेही नाराजी आहे, असे समजते.
विभागप्रमुख पदाचे अवमूल्यन ?
शिवसेनेने (शिंदे) एकूण ३२ विभागप्रमुखांची नावे जाहीर केली आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय विभागप्रमुख नेमण्यात आले आहेत. मुंबईत ३६ विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी ३२ विधानसभा मतदारसंघांसाठी विभागप्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेनेत विभागप्रमुख पद खूप मोठे आहे. एका विभागप्रमुखाच्या अधिकारात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे विभागप्रमुख पद मोठे असून त्या पदावरील पदाधिकारी भविष्यातील आमदार पदाचा उमेदवार मानला जातो. त्याच्या मतालाही पक्षात खूप महत्त्व असते.
मात्र शिवसेनेत (शिंदे) आता नियुक्त करण्यात आलेल्या विभागप्रमुखांकडे एक एक विधानसभा मतदारसंघ देण्यात आला आहे. त्यामुळे या पदाचे अवमूल्यन झाल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी या पद्धतीला विरोध केला असून एक विधानसभानिहाय असलेले पदही नाकारले आहे. तर आमदार अशोक पाटील (भांडूप), अविनाश राणे (अणूशक्ती नगर) आणि अल्ताफ पेवेकर (वर्सोवा) हे आधीच विभागप्रमुख होते. त्यांच्याकडे तीन मतदारसंघ होते. मात्र आता नवीन रचनेनुसार त्यांनी एका मतदारसंघाचे विभागप्रमुखपद स्वीकारले आहे. तर काही विभागप्रमुखांनी या पदरचनेला विरोध केल्याचेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.