मुंबई: गृहनिर्माण संस्थांमध्ये क्षुल्लक कारणांवरून सभासद किंवा संस्थेशी होणारे वाद, भांडणांचे पर्यवसान अनेकदा संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती किंवा न्यायालयात दावा दाखल होण्यापर्यंत जाते. मात्र येणाऱ्या काळात हे वाद संस्थेच्या स्तरावरच मिटावेत यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाच्या धर्तीवर तंटामुक्त सोसायटी अभियान सुरू करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला असून त्याचा शुभारंभ गुरुवारी पुण्यातून होणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात सहकारी संस्थांची संख्या सुमारे अडीच लाख असून त्यातील गृहनिर्माण संस्थांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यातही मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश तसेच नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा मोठय़ा शहरांमध्ये गृहनिर्माण संस्थांची संख्या अधिक आहे. गृहनिर्माण सोसायटीमध्ये अनेकदा विविध कारणांवरून वादविवादाच्या घटना घडतात. हे वादविवाद कधी सभासदांमध्ये तर कधी सभासद आणि सोसायटीमध्ये असतात. अनेकदा हे वाद इतके विकोपास जातात की त्यातून सोसायटीवर प्रशासक नियुक्तीची कारवाई करावी लागते. तसेच काहीवेळा न्यायालयीन प्रकरणेही घडतात. त्यामुळे हे वाद सोसायटीच्या स्तरावरच सामोपचाराने सोडविण्यासाठी तंटामुक्त सोसायटी अभियानाची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी सोसायटीमध्ये तंटामुक्त समित्या स्थापन केल्या जाणार असून त्यांच्यामार्फत वाद मिटविण्यात येणार आहेत. एखादा वाद सोसायटी स्तरावर मिटला नाही तर दुसऱ्या समितीमध्ये सोडविला जाईल. त्यामध्ये संबंधित गृहनिर्माण संस्था, सहकार विभाग आणि फेडरेशनचे प्रतिनिधी असतील. या योजनेमुळे सोसायटय़ा तंटामुक्त होऊन तेथील वातावरण चांगले राहील अशी माहिती सहकार आयु्क्त अनिल कवडे यांनी दिली. त्याचप्रमाणे सुप्रशान चालविणाऱ्या तसेच घनकचरा व्यवस्थापन, पाणी  व्यवस्थापन, स्वच्छता, याशिवाय चांगले नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या सोसायटींचा शासनस्तरावर सन्मानही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute resolution disputes between housing societies automatic transfer newly registered societies ysh
First published on: 26-05-2022 at 00:02 IST