मुंबई : वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली वावरत असतात. त्यानंतर व्यावसायिक क्षेत्रामध्ये येत असलेल्या आव्हानांमुळे ते अधिकच तणावाखाली असतात. त्यामुळे प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन केंद्र असले तरी व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे स्वत:च्या मानसिक आरोग्यासाठी आता डॉक्टरांनीच पुढाकार घेतला आहे. डाॅक्टरांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनीच स्वत:च हेल्पलाईन सुविधा सुरू केली आहे. डॉक्टरांना असणाऱ्या वैयक्तिक,अभ्यासाशी संबधित, नातेसबंधाबद्दलचे ताणतणावाबद्दल मोकळेपणाने येथे चर्चा करता येणार आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात तणावाखालील आयुष्य जगत आहेत. मागील काही वर्षांपासून डॉक्टरांमध्ये ताणतणावाचे प्रमाण वाढत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी डॉक्टर विविध प्रकारच्या ताणतणावांचा सामना करतात. त्यातूनच मागील सहा महिन्यांमध्ये सात डाॅक्टरांनी आत्महत्या केली, तर पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे डाॅक्टरांच्या मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली होती. त्यातून फेडरशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशने डॉक्टरांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी हेल्पलाईन सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा डॉक्टरांना सकाळी ७ वाजल्यापासून मध्यरात्री २ पर्यंत अशी २० तास उपलब्ध असणार आहे. डॉक्टरांना समुपदेशन करण्यासाठी ५० डाॅक्टरांची तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगु, तामिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली अशा विविध भाषांमधून समुपदेशक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती फेडरेशन ऑफ इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अक्षय डोंगरदिवे यांनी दिली.
डाॅक्टरांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न सुरू
शिक्षण घेताना तणावाखाली असलेल्या डॉक्टरांच्या समुपदेशनासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू केलेले समुपदेशन केंद्र, प्राध्यापकांचा पाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या सूचना याला डाॅक्टरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या डाॅक्टरांना या हेल्पलाईन सुविधेच चांगला लाभ होणार आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर, पदवी वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, वैद्यकीय संघटनांशी निगडीत डॉक्टर, व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर यांच्यापर्यंत ही सुविधा पोहचविण्यासाठी संघटनेकडून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती डॉ. अक्षय डोंगरदिवे यांनी दिली.
सर्वसामान्यांनाही करणार मार्गदर्शन
मानसिक आरोग्याबाबत समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरांच्या भ्रमणध्वनी क्रमांक संघटनेकडून जाहीर करण्यात आले आहेत. या क्रमांकावर डॉक्टरांव्यतिरिक्त एखाद्या सर्वसामान्य व्यक्तींने संपर्क साधल्यास त्यालाही मार्गदर्शन करण्यात येईल, असे संघटनेकडून सांगण्यात आले.