खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या अ‍ॅपविरोधात हॉटेल मालकांची एकजूट

अ‍ॅपआधारित खाद्यपदार्थ पुरवठादारांकडून (फूड सव्‍‌र्हिस अ‍ॅग्रीगेटर- एफएसए) घेतला जाणारा दुहेरी पुरवठा आकार (डिलिव्हरी चार्जेस), अवाच्या सवा सवलतींची मागणी याविरोधात देशभरातील हॉटेल मालकांच्या संघटना एकवटल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू झालेल्या या वादाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांत सुमारे तीन हजारहून अधिक हॉटेलांनी एफएसएबरोबरचे करार रद्द केले आहेत.

गेल्या दोन वर्षांत स्विगी, झोमॅटो यांसारखे अ‍ॅप वापरून विविध हॉटेलांमधून घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या सेवा अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. एफएसएमुळे अनेक हॉटेल्सच्या नवीन ग्राहकांमध्ये वाढ झाल्याचे हॉटेल मालक मान्य करतात. मात्र एफएसएनी सवलतींची टक्केवारी अवाच्या सवा वाढवल्यामुळे ते हॉटेल व्यवसायासाठी मारक असल्याचे कारण देत हॉटेल मालकांच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. ‘नॅशनल रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडिया’ (एनआरएआय) या देशव्यापी संघटनेच्या जोडीने ‘फेडरेशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडिया’, आहार, ठाणे हॉटेल असोसिएशन, पुणे रेस्टॉरन्ट अ‍ॅण्ड हॉटेल असोसिएशन अशा संघटना एफएसएच्या मनमानीला चाप लावण्यासाठी एकत्र आल्या आहेत. एनआरएआयने या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन हॉटेल मालकांची भूमिका मांडली.

या वर्षी ऑगस्टमध्ये एनआरएआयने दुहेरी पुरवठा आकाराच्या विरोधात अभियान सुरू केले. त्यानंतर अनेकदा एफएसएबरोबर चर्चा झाली असून, हॉटेल मालकांच्या अनेक मुद्दय़ांवर मार्ग काढणे शक्य झाले. मात्र झोमॅटोकडून अजूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसून, त्यांच्या अतिरिक्त सवलतींच्या योजनांमुळे व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे एनआरएआयचे अध्यक्ष अनुराग कटारिया यांनी सांगितले. विशेषत: झोमॅटो गोल्ड या योजनेअंतर्गत असणारी ५० टक्के सवलत ही अवाजवी असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘सवलतींमुळे व्यवसाय वाढल्याचे गाजर दाखवून एका भागातील वेगवेगळ्या हॉटेल मालकांना सवलती देण्यास उद्युक्त केले जाते, त्यामुळे अखेरीस प्रत्येकाचे नुकसान होते. भविष्यात त्यामुळे खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेवरदेखील परिणाम होऊ शकतो,’ अशी भीती ‘एफएचआरआए’चे सचिव जिमी शॉ यांनी या वेळी व्यक्त केली.

‘एफएसए हे हॉटेल मालकांचे व्यवसाय भागीदार असल्याचे सांगतात, पण त्यांच्या सवलतींचा भार हा हॉटेल्सवरच पडतो. त्यामुळे योग्य प्रकारे व्यवसाय करण्यासाठी ही पूरक रचना नसल्याचे एफएचआरएआयचे अध्यक्ष गुलबक्षसिंग कोहली यांनी सांगितले.

याशिवाय ग्राहक आणि हॉटेल मालक असा दोहोंकडून एफएसएने पुरवठा आकार घेणे, ग्राहकांची माहिती हॉटेल मालकांपासून लपवणे, विशिष्ट हॉटेलना प्राधान्य देणे अशा मुद्दय़ांवरून वाद अजूनही सुरूच असून त्यावर काही प्रमाणात तोडगा निघत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.