मुंबई : कविता काय करते? समाजातील तरलता टिकवते. अभिरुचीची पेरणी करते. कवितेचा आस्वाद घेण्याची कला ज्येष्ठ कवियत्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह अनुभवता येणार आहे. ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या वैशिष्ट्यपूर्ण, विविधांगी महोत्सवात कविता आणि मी हे डॉ. ढेरे यांचे सत्र १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कवितेचे घाट, थाट, कवितेचा आस्वाद कसा घ्यावा अशा अनेक मुद्द्यांवर संवाद साधण्याबरोबरच डॉ. ढेरे त्यांचा कवितेबरोबरील प्रवास मांडणार आहेत. कला आणि साहित्यातील विविध रंग, रुपे ल्यालेल्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट”चे उद्घाटन गुरुवारी झाले असून महोत्सवातील इतर सर्व कार्यक्रम १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
नादमय सुरांसह सुरू होणाऱ्या या महोत्सवातील पहिले साहित्य विषयक सत्र हे डॉ. अरुणा ढेरे यांचे असेल. त्यांच्या कवितांबरोबरच त्यांना आवडलेल्या कविता डॉ. ढेरे यांच्या ओघवत्या, रसाळ वाणीतून या सत्रात ऐकता येतील. समकालीन कवितांबरोबरच पूर्वकालीन कवितांचे काल सुसंगत असणे, मोठा नावलौकिक मिळालेल्या कवींसह काही तुलनेने प्रकाशात न आलेल्या कविंच्या कविता, काही आडवळणाच्या कवितांची ओळख डॉ. ढेरे करून देणार आहेत. चांगली कविता म्हणजे काय, तिचा आस्वाद कसा घ्यावा, कविता कशी अनुभवावी अशा अनेक मुद्द्यांवर त्या संवादही साधतील.
आस्वाद घेण्याची कला शिकवणारे हे सत्र शनिवारी, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत रविंद्र नाट्य मंदिराच्या मुख्य सभागृहात होईल.
‘भुरा’नंतरचे बाविस्कर’- यशाहूनही महत्त्वाचे काय असते?
‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर शरद बाविस्कर यांच्याशी संवाद
मुंबई : ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या वैशिष्ट्यपूर्ण, विविधांगी उपक्रमाचा भाग म्हणून ‘भुरा’ नंतरचे बाविस्कर’ या कार्यक्रमात ‘यशाहूनही महत्त्वाचे काय असते? किंवा यश मिळाल्यानंतरही, जबाबदारीचे सातत्यपूर्ण आणि नैतिक भान का हवे?’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. याचे उत्तर विविध काळांमध्ये, निरनिराळ्या तत्त्ववेत्त्यांच्या मांडणीतून मिळू शकते; त्यापैकी विशेषत: फ्रेंच व युरोपीय तत्त्वज्ञानाचे बाविस्कर हे अभ्यासक आहेत.
अनेकविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देणारी आखणी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ने केलेली आहेच. या कार्यक्रमांच्या आस्वादासोबतच विशेष चर्चासत्र , संवाद असेही कार्यक्रम होणार असून या निमित्ताने वैचारिक मेजवानी मिळणार आहे. ‘भुरा’ या आत्मपर कादंबरीचे लेखक म्हणून शरद बाविस्कर हे सर्वांना परिचित असणारे नाव; पण २०२५ मध्ये ‘लोकसत्ता’साठी दर सोमवारी ते ‘तत्त्व-विवेक’ ही पाश्चात्त्य तत्त्वज्ञानावर आधारलेली लेखमाला लिहू लागले. सामाजिक भाषाशास्त्र, फ्रेंच साहित्य, संस्कृती अध्ययन आणि तत्त्वज्ञान अशा विविध विषयांचा अभ्यासपूर्ण वेध घेणारे बाविस्कर हे मूळचे धुळे जिल्ह्यातले. आयुष्यात जिद्द असली की काहीच अशक्य नसते हे त्यांनी दाखवून दिले आहे. भारतातील दोन आणि युरोपातील तीन पदव्युत्तर पदव्या असा त्यांचा चढता शैक्षणिक आलेख. बाविस्कर सध्या नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात फ्रेंच साहित्य व तत्त्वज्ञान या विषयाचे अध्यापन करत आहेत.
‘भुरा’नंतरचे बाविस्कर’ या कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे संपादकीय पाने समन्वयक अभिजित ताम्हणे हे त्यांच्याशी संवाद साधतील. हा कार्यक्रम पु.ल. देशपांडे सभागृह, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:१५ ते ६:१५ या वेळेत होणार आहे.
व्यंगचित्रांवर गप्पा, चर्चा आणि सादरीकरण
मुंबई : ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ हा मराठी साहित्य, विविधांगी कला, संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा यंदा प्रथमच आयोजित केला जात आहे. या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. याच विशेष कार्यक्रमाचा भाग म्हणून व्यंगचित्रांवर आधारित ‘चित्र आणि वाङ्मय’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकसत्ता’चे प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी हे या कार्यक्रमातून व्यंगचित्रांचे जग उलगडणार आहेत.
उपहास, विनोद आणि कल्पकता यांचा संगम म्हणजे व्यंगचित्र. वैशिष्ट्यपूर्ण असणारी ही व्यंगचित्रे सहजच वाचकांचे लक्ष वेधून घेत असतात. दैनंदिन आयुष्यातील अनेक घटनांवर ‘लोकसत्ता’मधून दररोज ‘काय चाललंय काय’ विचारत व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रे उपहासात्मक भाष्य करतात. राजकारणातील दररोजच्या घटना आणि विविध विषयांवरील त्यांची व्यंगचित्रे वैशिष्ट्यपूर्ण आणि बोलकी असतात. यानिमित्ताने त्यांच्याकडून व्यंगचित्रांचे व्यापक जग जाणून घेण्याची संधी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर ‘चित्र आणि वाङ्मय’ या विशेष कार्यक्रमातून मिळणार आहे.
यानिमित्ताने व्यंगचित्रांविषयी अधिक जाणून घेता येणार आहे. व्यंगचित्रांवर गप्पा, चर्चा आणि सादरीकरण असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून यानिमित्ताने व्यंगचित्रांच्या अनोख्या विश्वाची सफर प्रशांत कुलकर्णी रसिक प्रेक्षकांना घडवणार आहेत. हा कार्यक्रम पु.ल. देशपांडे सभागृह, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:४५ ते ४:४५ या वेळेत होणार आहे.
‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रवेशिका शुक्रवार, ३१ ऑक्टोबरपासून रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे उपलब्ध होतील. तसेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांसह संपूर्ण कार्यक्रमपत्रिका क्यूआर कोड स्कॅन करून पाहता येईल.
