मुंबई : मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रा’ची (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर) स्थापन केली जाणार आहे. यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने मंजुरी दिली असून, लवकरच हे केंद्र कार्यान्वित होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्याय, समता, मानवी हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाशी निगडित विचार शैक्षणिक व धोरणात्मक पातळीवर प्रसारित केले जाणार आहेत.

डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्यासह शिक्षण व रोजगार क्षेत्रातील धोरणांचा वंचित घटकांवर होणारा परिणाम अभ्यासणे, कौशल्य विकासासंबंधित उपयुक्त योजना सुचविणे, विविध परिसंवाद, व्याख्याने, परिषदा आयोजित करणे ही या अध्यासन केंद्राची मुख्य उद्दिष्टे असतील. तसेच शिक्षणातील प्रवेश, गुणवत्ता व समावेशकता यावरही विशेष भर दिला जाणार आहे. सध्या मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कार्यान्वित असून या केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता अध्यासन केंद्राच्या स्थापनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक देवाण-घेवाणीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.

लवकरच डॉ. आंबेडकर फाऊंडेशन आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात अध्यासन केंद्राच्या स्थापनेसाठी करार केला जाणार आहे. या अध्यासन केंद्राच्या अंतर्गत प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि दोन डॉक्टरेट फेलो नियुक्त केले जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे या अध्यासन केंद्राच्या स्थापनेसाठी वार्षिक रुपये ७५ लाखांचे अनुदानही मंजूर करण्यात आले आहे.

सखोल अभ्यास, संशोधनाला प्रोत्साहन

अध्यासन केंद्राच्या माध्यमातून बहुविद्याशाखीय अभ्यास व संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील संविधानिक विविध तरतुदींचा प्रभाव, वंचित घटकांचे शैक्षणिक प्रगतीचे प्रवाह, तसेच शैक्षणिक व रोजगारातील दरी कमी करण्यासाठी राबविलेल्या योजना आदी विविध गोष्टींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. त्याचबरोबर एम. ए. सोशल पॉलिसी, एम. ए. बुद्धिस्ट स्टडीज यासारख्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह संशोधन प्रकल्प, डॉक्टरेट व पोस्ट डॉक्टरेट अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत.

सामाजिक न्याय व समतेच्या तत्त्वांवर आधारित धोरणांची निर्मिती हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असून शिक्षण, रोजगार व समतेसंबंधी धोरणांचा अभ्यास करून न्याय्य व सर्वसमावेशक समाज घडविण्याचा प्रयत्न होईल. हे अध्यासन केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. – डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ