डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येबाबत सध्या अटकेत असलेल्या सनातन संस्थेच्या डॉ. वीरेंद्र तावडे याला ईमेल पाठविण्यात आला होता आणि या ईमेलमागील सूत्रधाराचा शोध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सध्या सुरू केला आहे. या ईमेलमागील सूत्रधाराची संदिग्ध माहिती मिळाली असून हाती पुरावा आल्यानंतर संबंधिताला ताब्यात घेतले जाईल, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील तपासाशी संबंधित असलेल्या या अधिकाऱ्याने सांगितले की, दाभोलकर यांची हत्या करणाऱ्या सर्वच मारेकऱ्यांची ओळख पटली आहे. हेच मारेकरी ज्येष्ठ कॉम्रेड नेते गोंविद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही असावेत, असा दाट संशय आहे. मात्र अद्याप तसे पुरावे मिळालेले नाहीत. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी डॉ. तावडे याला पाठविण्यात आलेल्या ईमेलचे गूढ वाढले आहे. या ईमेलला डॉ. तावडेने उत्तर दिलेले नाही वा मेल काढूनही टाकलेला नाही. या ईमेलचा स्रोत शोधण्यात येत आहे. जी माहिती मिळाली आहे त्यातून सूत्रधाराची पुसटशी कल्पना आल्याचेही त्याने स्पष्ट केले. या हत्या प्रकरणाचे धागेदोर गोव्यापर्यंत पोहोचले आहेत, असे स्पष्ट करून अधिक सांगण्यास या अधिकाऱ्याने नकार दिला. गेले काही महिने हा तपास सुरू होता. तेव्हा हिंदू जनजागृती संघटनेच्या अनेकांवर पाळत ठेवण्यात आली होती. तेही दुवे जुळत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.