मुंबई : ‘शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा – २०२५’ हा अतिशय काळजीपूर्वक तयार केला असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील ध्येयांना या मसुद्यात पूर्ण न्याय दिला आहे. त्यामुळे शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांबरोबरच अभ्यासक्रम मसुद्याचा अभ्यास करायला हवा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. ‘शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा-२०२५’ या विषयावर शिक्षण विकास मंचातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्यावतीने २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत ऑनलाइन शिक्षण कट्टा आयोजित करण्यात आला.
ऑनलाईन शिक्षक कट्ट्यामध्ये शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुद्याबाबत विविध विषयासंदर्भात तज्ज्ञांनी मते मांडताना मसुद्यामध्ये काय आहे, त्यात कोणत्या सुधारणा करणे अपेक्षित असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी लेखन नियमासह सर्व नियम पाचवीपासून दहावीपर्यंत टप्प्याटप्याने करून दिल्यास विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. भाषा विषयासाठीचे व्याकरण किती महत्वाचे आहे आणि त्याची ओळख इयत्तावार दहावीपर्यंत व्हावी, असे मत स्वाती तडफळे यांनी मांडले. मातृभाषा धोरणाला या मसुद्यामध्ये महत्त्व दिले आहे. भाषेचे अध्ययन व अध्यापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन मसुद्यामध्ये दिले असल्याचे संपदा जोशी यांनी सांगितले.
पूर्वीच्या अध्ययन निष्पतीपेक्षा या मसुद्यामध्ये दिलेल्या अध्ययन निष्पती सुटसटीत दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमके काय शिकवायचे याबाबात शिक्षकांची संकल्पना स्पष्ट होणार आहे. विद्यार्थ्यांना गणित उत्तमरित्या समजावे यासाठी यामध्ये भर दिल्याचे अजित तिजोरे यांनी सांगितले. त्याचबरोबर इंग्रजीबाबत अचला मचाडो, विज्ञानबाबत शशिकला पाटील, इतिहास, नागरिकशास्त्र विषयावर राहुल प्रभू, इतिहास, राज्यशास्त्रबाबत भाऊसाहेब उमाटे, भूगोल विषयाबाबत पद्माकर हिरनाईक, अर्थशास्त्र या विषयावर दिनेश जोशी यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. तसेच शासनाला तपशीलवार सूचना केल्या.
‘शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा-२०२५’ जनतेच्या अभिप्रायासाठी उपलब्ध करण्यात आला असून याबाबत सामाजिक भान आणि शैक्षणिक भूमिका तयार व्हावी या हेतूने कट्ट्याचे आयोजन करण्यात आल्याचे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचचे मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी सांगितले. लवचिकता हे या अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात ठेवून तो तयार केला आहे. या अभ्यासक्रमात काय असायला हवे याबाबत सूचना यायला हव्यात, असे शिक्षण विकास मंचाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डाॅ. वसंत काळपांडे यांनी सांगितले.
नवीन मसुदा अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आला असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील ध्येयांना पूर्ण न्याय या मसुद्यात देण्यात आला आहे. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांबरोबरच अभ्यासक्रम मसुद्याचा अभ्यास केला पाहिजे, अशी अपेक्षा शिक्षण विकास मंचच्या विशेष सल्लागार बसंती रॉय यांनी व्यक्त केली.