महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने विदेशातून तस्करीच्या सोन्याची वाहतूक करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक केली असून याप्रकरणी १३ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत साडेआठ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. ऑक्टोबर महिन्यात डीआरआयने कारवाई करून ११ जणांना अटक केली होती. त्याच्या ताब्यातून ३१ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत १९ कोटी रुपये होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबईः अभिनेता शाहरुखच्या वाढदिवसाला चाहत्यांचे १७ मोबाईल चोरीला

सोन्याची तस्करी करणाऱ्या याच टोळीशी संबंधित आणखी काही तस्कर सक्रिय असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे डीआरआय, मुंबईच्या पथकाने पुण्याजवळ बसमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली होती. ३० ऑक्टोबर रोजी त्यांच्या ताब्यातून पाच किलो सोने जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला होता. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी आरोपीच्या घरी छापा मारण्यात आला. त्यात वाराणसीहून नागपूरला दोघेजण सोने घेऊन येणार असल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्यांना समजले. त्यानंतर वाराणसी येथील डीआरआयच्या स्थानिक पथकाच्या मदतीने कारवाई करून आठ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. सोने नागपूरला घेऊन जाणाच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत १३ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत साडेआठ कोटी रुपये आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील तिघांना डीआरआयच्या मुंबई विभागाने, तर दोघांना वाराणसी डीआरआयने अटक केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dri arrested five in gold smuggling case gold worth over rs eight crore seized mumbai print news zws
First published on: 02-11-2023 at 22:55 IST