मुंबई : राज्यात घराणेशाहीचे मोठे संकट उभे राहिले असून पिढय़ानपिढय़ा एकाच घराण्याने पक्ष चालविणे लोकशाहीला घातक आहे. मुंबई व महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आणि प्रायव्हेट लिमिटेड पक्षाला सत्तेतून हटविण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील वसंत स्मृती कार्यलयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संघर्षांला तयार राहण्याचे आवाहन केले. फडणवीस म्हणाले, भाजपची निर्मिती राष्ट्रवादातून झाली असून संघर्ष करीत तो जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे.  धर्मनिरपेक्षततेच्या नावाखाली विशिष्ट धर्मीयांचे लांगूलचालन आतापर्यंत होत होते. मात्र शासकीय योजनांचा लाभ जात, धर्म न पाहता प्रत्येक नागरिकापर्यंत पोचविणे, अशी धर्मनिरपेक्षतेची नवी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुजविली. देशातील तळागाळांपर्यंतच्या व्यक्तींना सेवा देण्याचे काम भाजप करीत आहे. राज्यातील परिस्थिती भयानक असून सरकारविरोधात बोलल्यास तुरुंगात डांबले जाते. घरे तोडली जात असून संस्कृती पायदळी तुडवली जात असल्याने महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे.

 मुंबई महापालिकेने करोनाकाळात  प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला असून सत्ताधाऱ्यांनी प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे. विधिमंडळ अधिवेशनात मुंबई महापालिकेतील गैरव्यवहार उघड करूनही मुख्यमंत्र्यांनी त्यावर चकार शब्द उच्चारला नाही. त्यामुळे पुढील काळात घराणेशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष करावा लागणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.  काही नेते लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नखे कापून शहीद होण्याचा प्रयत्न करीत असल्याचा टोला फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला.

 राऊत यांना पुराव्यांच्या आधारे नोटीस देण्यात आली असून त्यांनी कायद्यानुसार उत्तर द्यावे. आमच्या अनेक नेत्यांवरही होत असलेल्या कारवायांबाबत आम्ही कायद्यानुसारच उत्तर देत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. या वेळी आमदार आशीष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार कालिदास कोळंबकर, कॅप्टन आर तमिळ सेल्वन आदी उपस्थित होते.