मुंबई: जागतिक एड्स दिनानिमित्त मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीने एड्स रुग्णांना घरबसल्या औषधोपचार सेवा मिळावी यासाठी ‘ई निरंतर’ ऑनलाईन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एड्स रुग्णांना विविध कारणांमुळे रुग्णालयात जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही, त्यामुळे ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीचे उप संचालक आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कुमार करंजकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एड्सग्रस्त रुग्णांना आयुष्यभर औषधोपचार करावे लागतात. काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यास त्यांना वारंवार रुग्णालयात जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही. रुग्णांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन एड्स दिनापासून ‘ई निरंतर’ ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांची वैद्यकीय माहिती एका क्लिकवर डॉक्टरांना उपलब्ध होणार आहे. तसेच रुग्णालयात रुग्णांची नस्ती शोधण्याचा त्रासही कमी होऊन वेळेची बचत होणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून रुग्णांना डॉक्टरांची वेळ घेणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती  डॉ. करंजकर यांनी दिली.

हेही वाचा >>> देशभरातील सर्व आधारकार्डची माहिती त्यांच्याकडे कशी पोहोचते?

रेल्वे स्थानकांवर करणार तपासणी

एड्स या आजाराबाबत नागरिकांनी स्वतःची तपासणीसाठी पुढाकार घ्यावा यासाठी रेल्वे स्थानकावर एड्सच्या तपासणीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, घाटकोपर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, मानखुर्द आणि वडाळा या नऊ रेल्वे स्थानकांवर तपासणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद््घाटन मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प अधिकारी रमाकांत बिरादार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  गतवर्षी राबवलेल्या या उपक्रमात तब्बल २० हजार नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E continuous service treatment of aids patients occasion of world aids day mumbai print news ysh
First published on: 01-12-2022 at 12:40 IST