मुंबई…कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरील वांद्रे-कुर्ला संकुल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि वरळी मेट्रो स्थानकावरुन इच्छितस्थळी जाणे आता मेट्रो प्रवाशांना सोपे होणार आहे. मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यानंतर इच्छितस्थळ, कार्यालय गाठणे प्रवाशांसाठी काहीसे अडचणीचे होते. हे लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) या तीन मेट्रो स्थानकांवर फीडर बससेवा सुरु केली आहे. मंगळवारपासून या सेवेला सुरुवात झाली आहे.
भुयारी मेट्रो मार्गिकेच्या शेवटच्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड टप्प्याचे लोकार्पण होऊन हा टप्पा ९ सप्टेंबरला वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. मेट्रो ३ पूर्ण क्षमतेने धावू लागली असून या मार्गिकेला मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसह चर्चगेट, सीएसएमटीतील सरकारी, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बीकेसीतील नोकरदारांसाठीही मेट्रो फायद्याची ठरत आहे. मात्र बीकेसी, सीएमएमटी आणि वरळी स्थानकावर उतरल्यानंतर पुढे इच्छितस्थळी जाणे प्रवाशांना काहीसे अडचणीचे ठरते.
रिक्षा, टॅक्सी, बसवर अवलंबून राहू लागते. आता मात्र बीकेसी, वरळी, सीएसएमटी मेट्रो स्थानकावरुन इच्छितस्थळी जाणे सोपे होणार आहे. कारण एमएमआरसीने आता या तीन मेट्रो स्थानकाबाहेरुन फीडर बससेवा सुरु केली आहे. या सेवेला मंगळवारपासून सुरुवात झाल्याची माहिती एमएमआरसीने दिली आहे. एमएमआरसी आणि सिटीफ्लो यांच्या संयुक्त भागीदारीने ही फीडर बससेवा सुरु करण्यात आली आहे.
बीकेसीमध्ये मागील काही दिवसांपासून वातानुकुलित गाड्यांच्या चाचण्या सुरु होत्या. त्या यशस्वी झाल्यानंतर आता तीन मेट्रो स्थानकांवर ही सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार बीकेसी फीडर बससेवा एनएसई, जिओ गार्डन, वन बीकेसी आणि कौटुंबिक न्यायालयापर्यंत धावणार आहे. वरळीतील फीडर बससेवा सेंच्युरी मिल्स, वन इंडिया बुल्स सेंटर, कमला मिल्स आणि पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क अशी धावणार आहे.
सीएसएमटी फीडर बससेवा मार्ग जुने कस्टम हाऊस, लायन्स गेट, एस.पी. मुखर्जी चौक, के.सी. कॉलेज आणि चर्चगेट मेट्रो स्थानक अशी धावणार आहे. गर्दीच्या वेळी या बस दर १० मिनिटांनी धावतील. सुरुवातीचे भाडे प्रति प्रवास २९ रुपये असून मासिक पास ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी तिकिट खरेदीची सुविधा सिटीफ्लो अॅप तसेच मेट्रो कनेक्टर३ अॅपवर एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.