‘नटसम्राट’ आणि ‘कर्माचा सिद्धांत’ला मागणी; वर्षभरात ३५ हजार पुस्तके ई-पुस्तकांचे वाचन; तंत्रज्ञानातील बदलांना प्रतिसाद
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केवळ एका क्लिकवर उपलब्ध होणाऱ्या ई-पुस्तकांच्या विक्रीत दुपट्टीने वाढ झाली आहे. वर्षभरात सुमारे २५ हजार विनामूल्य, तर १० हजार शुल्क भरून ई-पुस्तके डाऊनलोड करण्यात आली आहेत. यात वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट’ आणि हिराभाई ठक्कर यांचे ‘कर्माचा सिद्धांत’ या पुस्तकांना वाचकांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी लोकप्रिय ठरत असलेल्या ‘बुकगंगा’ या संकेतस्थळावर २०० प्रकाशकांची ई-पुस्तके उपलब्ध आहेत. यात पुस्तक वाचनाची आवड असूनही नोकरी-व्यवसायामुळे दुकानात जाऊन पुस्तकांची खरेदी करण्यासाठी वेळ नसलेल्या वाचकांनासाठी ई-पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ई-पुस्तकांची गेल्या वर्षभरात जोरदार मागणी वाढली आहे. यात ‘नटसम्राट’, ‘कर्माचा सिद्धांत’, ‘शिवाजी कोण होता’, ‘कोसला’, आणि ‘मुसाफिर या ई-पुस्तकांचा समावेश आहे.
सध्या बुकगंगा या संकेतस्थळावर मराठीतील ८०० प्रकाशकांची छापील तर २०० प्रकाशकांची ई-पुस्तके उपलब्ध आहेत. यात दुकानात जाऊन पुस्तक खरेदी करण्याची मागणी वाढत आहे. तर वाचक तंत्रज्ञानाभिमुख होत असताना या बदलाची दखल प्रकाशकांकडूनही घेतली आहे. त्यामुळे बुकगंगा, फ्लिपकार्ट, अ‍ॅमॅझॉन अशा सेवा देणाऱ्या संकेतस्थळांवरूनही मोठय़ा प्रमाणात पुस्तके उपलब्ध होत आहेत. क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे किंवा नेटबॅकिंगच्या माध्यमातून शुल्क भरून काही वेळातच ई-पुस्तक वाचकांच्या भ्रमणध्वनीच्या किंवा संगणकांच्या स्क्रीनवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे या पर्यायाकडे वाचक वळत असल्याचे सांगितले जात आहे.
श्राव्य माध्यमातील पुस्तके लवकरच
मराठी पुस्तकांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या ‘बुकगंगा’कडून श्राव्य माध्यमातील पुस्तकांची निर्माती केली जात आहे. सुरुवातील २५ पुस्तके आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व पुस्तके रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यामुळे वाचन करण्याची आवड असून वेळ न मिळणाऱ्या वाचकांसाठी ही पर्वणी ठरणार असल्याचे जोगळेकर यांनी सांगितले.

ऑनलाइन पद्धतीने पसे भरून ई-पुस्तक काही क्षणात उपलब्ध होते. यात शहरातील नोकरी-व्यवसाय करणाऱ्या वाचकांकडून ऑनलाइन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण झपाटय़ाने म्हणजे दुपट्टीने वाढले आहे. यात १० हजार पैसे भरून तर २५ हजार विनाशुल्क असलेली ई-पुस्तके डाऊनलोड करण्यात आले आहेत. यात नि:शुल्क उपलब्ध होणाऱ्या पुस्तकांत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य सर्वाधिक डाऊनलोड केले जात आहे.
-मंदार जोगळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुकगंगा