मुंबई : मालाड येथील प्रकल्पात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून तीस जणांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकाविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. गुंतवणुकदारांची सुमारे साडे बारा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बोरीवली पूर्व येथील रहिवासी नरेंद्रकुमार पोद्दार यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोद्दार व्यवसायाने सनदी लेखापाल आहेत. त्यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने अथर्व डेव्हलपर्स प्रोप्रायटरी फर्मचे मालक दीपक शहा यांच्याविरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरण काय ? मालाड येथील एका प्रकल्पात गुंतवणूक केल्यास २४ टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवून आरोपीने तक्रारदार व इतर २९ जणांकडून १२ कोटी ५६ लाख रुपये घेतले. त्यातील ३ कोटी ७७ लाख २५ हजार धनादेशाद्वारे तर ८ कोटी ७८ लाख रुपये रोखीने घेतले. त्या बदल्यात तक्रारदार व इतर गुंतवणूकदारांना पावत्या, हमीपत्रे, कोरे धनादेश दिले होते. सुरूवातीला दोन टक्के प्रति महिना व्याज दिले. तक्रारदार पोद्दार यांनी त्या रकमेचे सर्वांना वाटप केले. व्याजाच्या रुपाने सर्वांना ४९ लाख ९३ हजार रुपये मिळाले. तक्रारदारांना काही काळ त्यांचे व्याज मिळाले. परंतु मार्च २०२० नंतर तक्रारदार यांना कोणतेही व्याज अथवा त्यांची मुद्दल परत करण्यात आली नाही. त्यामुळे नुकतीच तक्रारदार व इतर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.