महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी सोमवारी रात्री सक्तवसुली महासंचलनालयाकडून(ईडी) छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली असून त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ईडीने विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देण्यात समीर भुजबळ अपयशी ठरल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या अटकेची शक्यताही वाढली आहे. दरम्यान, छगन भुजबळ हे उपचारासाठी अमेरिकेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणी सक्तवसुली महासंचालनालयाने काळापैसाविरोधी दाखल केलेल्या गुन्ह्य़ात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ तसेच पंकज आणि समीर भुजबळ हे संचालक असलेल्या विविध कंपन्यांच्या कार्यालयांवर सोमवारी छापे टाकले. मुंबईतील सांताक्रूझ, वरळी येथील भुजबळांच्या निवासस्थानासह वांद्रे येथील एमईटी संस्थेचा ‘ईडी’कडून छापे टाकण्यात आलेल्या ९ ठिकाणांमध्ये समावेश आहे. याआधीही महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी समीर आणि पंकज भुजबळ यांना ईडीकडून समन्स धाडण्यात आले होते. तरीही दोघे ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नाहीत. अखेर सोमवारी दुपारी समीर भुजबळ मुंबईतील बलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर ईडीकडून झालेल्या ९ तासांच्या चौकशीनंतर समीर यांना अटक करण्यात आल्याची माहिती संस्थेतील अधिकाऱयांनी दिली. याशिवाय समीर भुजबळ यांचा जबाबही यावेळी नोंदविण्यात आला. छगन भुजबळ हे उपचारासाठी अमेरिकेत गेलेले असल्यामुळे ते यावेळी उपलब्ध नव्हते, असे सांगण्यात आले. समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ‘आम्ही करून दाखवलं, समीर भुजबळांना ईडीने अटक केली आता पंकज भुजबळांचा नंबर’, असे ट्विट केले आहे.

यापूर्वी मागील वर्षी जून महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळांच्या घरांवर आणि कार्यालयांवर एकूण १६ ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर सक्तवसुली संचलनालयानेही आपली कारवाई अधिक वेगवान करत भुजबळांच्या मुंबईतील काही मालमत्तांवर छापे टाकले होते.