मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) परिमॅच नावाच्या बेकायदेशीर बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, जयपूर, मदुराई, सूरत अशा सुमारे १७ ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी विविध राज्यांमधील बँक खाती गोठवण्यात आली आहे. त्यात तब्बल ११० कोटी रुपये असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याने २०२४ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे.
प्राथमिक चौकशीनुसार बेटिंग ॲपमधून कमावलेली गैरव्यवहाराची रक्कम बनावट बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येत होती. त्यातून पैशांची देवाण-घेवाण करण्यात येत होती. अशा प्रकारे एकूण तीन हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम व्यवहारात आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर ती रक्कम कूट चलनात हस्तांतरित करण्यात आली. तमिळनाडूतील एका विभागातील एटीएममधून रोख पैसे काढण्यात आले, तसेच छोटे व्यवहार यूपीआयद्वारे करण्यात आले. त्यामुळे आरोपींच्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे शक्य नव्हते. ईडीने गेल्या काही महिन्यांपासून गैरव्यवहारातील रकमेचा माग काढून हा संपूर्ण गैरव्यवहार उघड केला. याप्रकरणी मंगळवारी मुंबई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, जयपूर, मदुराई, सूरत अशा सुमारे १७ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
बेकायदा व्यवहार कसे लपवले
पश्चिम भारतात पॅरिमॅचने ‘डोमेस्टिक मनी ट्रान्सफर’ दलालांची मदत घेतली. त्यांच्या ताब्यातील बनावट खात्यांमधून पॅरिमॅच त्यांच्या दलालांना क्रेडीटकार्डद्वारे पैसे पाठवण्यात येत होते. गैरव्यवहारात वापरण्यात आलेली १२०० क्रेडिट कार्ड या छाप्यांमध्ये जप्त करण्यात आली. ईडीच्या तपासानुसार, रिझर्व्ह बँकेने पेमेंट ॲग्रीगेटर परवाना नाकारलेल्या संस्थांकडूनही याबाबत व्यवहार झाले आहेत. त्या काही संस्था व कंपन्यांनी ‘टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हायडर्स’ म्हणून पॅरिमॅचला सेवा पुरवल्या. त्या टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हायडर्सने त्यांचे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस या दलालांना दिले. त्यांनी ई-कॉमर्स कंपन्या आणि पेमेंट सोल्यूशन पुरवठादार कंपन्यांच्या नावाने बनावट खाती उघडून त्यामार्फत यूपीआयद्वारे रक्कम गोळा केली. नंतर ही रक्कम ‘ई-कॉमर्स रिफंड’, ‘चार्जबॅक’ किंवा ‘व्हेंडर पेमेन्ट’च्या नावाखाली पाठवला. हा बेकायदा व्यवहार लपवण्यासाठी ही कार्यपद्धती वापरण्यात आल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पॅरिमॅचने मोठ्या प्रमाणावर जाहिरात मोहीम राबवून आपली बाजारपेठ वाढवली. यात क्रीडा स्पर्धांचे प्रायोजकत्व, प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत भागिदारी, तसेच ‘परिमॅच स्पोर्ट्स ’ आणि ‘ परिमॅच न्यूज ’ या नावाने भारतीय कंपन्या स्थापन करून त्याद्वारे जाहिराती करण्यात आल्या. त्या संस्थांना विदेशी चलनात रक्कम देण्यात आली. याप्रकरणी ईडीचा तपास सुरू असून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.