राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली. त्यानंतर आता नवाब मलिक यांना आणखी एक धक्का बसला आहे. नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने समन्स बजावले आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, नवाब मलिकांना अटक केल्यानंतर ईडीने कप्तान मलिक यांना समन्स जारी केले आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्डिरग प्रकरणी ईडीने नवाब मलिकचा भाऊ कप्तान मलिक यांना समन्स बजावले आहे, असे एएनआयने म्हटले आहे. मात्र कप्तान मलिक यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
“मलिक कुटुंबाला कितीही दाबलं तरी ते थांबणार नाही. आम्हाला नवाब मलिक वडिलांप्रमाणे आहेत. त्यामुळे ते जे काही आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. मला ईडीने कुठलीही नोटीस बजावली नाही,” असे कप्तान मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने बुधवारी मलिकांवर कारवाई केली.
मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पहाटे पाचच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी पोहोचले. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवानही त्यांच्याबरोबर होते. या कारवाईबाबतची कोणतीही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नाही. त्यावेळी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करायची असल्याचे सांगून ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी मलिक यांना त्यांच्याबरोबर येण्यास सांगितले. मलिक यांनी काही वेळ मागून घेतला. त्यानंतर ते ‘ईडी’ कार्यालयाकडे निघाले. त्यावेळी त्यांचे पुत्र आमीर हे त्यांच्याबरोबर होते. सकाळी साडेसातच्या सुमारास मलिक यांना ‘ईडी’च्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आणण्यात आले. सुमारे साडेसात तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी पावणे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली.