मुंबई : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानावर छापा टाकल्यानंतर आता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावले आहे. त्यांच्यासह एकूण सहा जणांना समन्स बजावले असून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला. ईडीने याप्रकरणी मंगळवारी पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात एक कोटी ३३ लाख रुपये व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

वसई – विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी ईडीने मंगळवारी छापे टाकले. त्यावेळी नाशिक येथील त्यांच्या पुतण्याकडून एक कोटी ३३ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणानंतर याबाबतच अधिक माहिती घेण्यासाठी ईडीने पवार यांना समन्स बजावले आहे. याप्रकरणी पवार यांच्यासह एकूण सहा जणांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पवार यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. ते तीन वर्ष या पदावर कार्यरत होते. पालिकेच्या सभागृहात सोमवारी पवार यांचा छोटेखानी निरोप समारंभ पार पडला. त्यानंतर मंगळवारी ईडी थेट त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली.

ईडीने मंगळवारी पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात वसई-विरार, मुंबई व नाशिक येथील ठिकाणांचा समावेश आहे. ईडीने वसई – विरार परिसरात बेकायदेशीर राहिवासी व व्यावसायिक इमारतींच्या बांधकामांप्रकरणी मोठी कारवाई हाती घेतली आहे. छाप्यांमध्ये नाशिक येथील पवार यांच्या नातेवाईकाच्या घरातून एक कोटी ३३ लाख रुपयांची रोकड जप्त केली. याशिवाय या कारवाईत मालमत्तांची कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिरा – भाईंदर पोलीस आयुक्तालयामार्फत दाखल करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांच्या आधारे ईडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सुमारे ६० एकर क्षेत्रफळावर बेकायदेशीरपणे ४१ राहिवासी व व्यावसायिक इमारती उभारल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात या भूखंडावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचरा डेपोचे आरक्षण होते. पण आरोपींनी संगनमत करून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले. त्यासाठी आरोपी बांधकाम व्यावसायिक आणि स्थानिक दलालांनी मंजुरीची बनावट कागदपत्रे तयार केली होती. त्याद्वारे सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणात सदनिकांची विक्री करण्यात आली. त्यामुळे अनेक गरीब व निरपराध नागरिकांची फसवणूक झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चावी बनवणाऱ्याच्या मदतीने ईडीचे अधिकारी घरात शिरले

छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांना बराच वेळी पवार यांच्या घराबाहेर तात्कळत उभे रहावे लागले. ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बराच वेळ बाहेर उभे राहिल्यानंतरही पवार यांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला नाही. त्यामुळे अखेर यासंदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती देऊन मदत मागण्यात आली. स्थानिक पोलिसांचे पथक पवार यांच्या घराबाहेर दाखल झाले. त्यांच्या मदतीने चावी बनवणाऱ्याला बोलवण्यात आले. त्याने पोलिसांच्या उपस्थितीत चावी बनवून दरवाजा उघडून दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पवार यांच्या घरात प्रवेश केला. या कालावधीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील काही महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे, त्याचीही पडताळणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.