अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नव्याने समन्स बजावले आहे. त्यानुसार, ५ जानेवारी रोजी वर्षा राऊत यांना ईडीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

वर्षा राऊत यांना ईडीने यापूर्वी समन्स बजावले होते आणि २९ डिसेंबर रोजी अर्थात आजच चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, राऊत यांनी ईडीकडे थोडा वेळ मागितला होता. त्यांची ही विनंती स्विकारत ईडीने पुन्हा नव्याने समन्स पाठवत ५ जानेवारी पूर्वी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले.

सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे.

आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला होता संताप

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आल्याने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. “हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.