Eid-e-Milad holiday in Mumbai: महाराष्ट्र सरकारने मुंबईसाठी ईदच्या सुट्टीत बदल केला आहे. यापूर्वी ५ सप्टेंबर रोजी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शीनिमित्त राज्यभरात श्रीगणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहेत. त्यातही मुंबईत मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्यामुळे अनेकांनी ईदची सुट्टी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता मुंबई आणि मुंबई उपनगर करिता ही सुट्टी बदलली गेली आहे.
हिंदु -मुस्लीम एकोपा अबाधित राहावा या उद्देशाने विविध मुस्लीम संघटनांची ऑल इंडिया खिलाफत कमिटीची मुंबईत बैठक पार पडली होती. या बैठकीत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जन्मदिनी काढण्यात येणारा जुलूस सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्याचा सर्वानुमते निर्णय झाला, अशी माहिती समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी होती.
‘ईद -ए-मिलादुन नबी’चे जुलूस ८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याने या दिवशी राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.

८ सप्टेंबर रोजी ईदची सुट्टी
सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधी शासन परिपत्रक काढले आहे. त्यानुसार आता मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यासाठी ८ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी कायम असेल.
परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (५ सप्टेंबर) मुंबईतील सर्व शासकीय कार्यालये नियमित पद्धतीने काम करतील. शाळा आणि महाविद्यालयेही सुरूच राहणार आहेत. शुक्रवार ऐवजी त्यांना सोमवारी सुट्टी देण्यात येईल.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणुकीसाठी शहरात ठिकठिकाणी गर्दी होत असते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागतो. तसेच ईदच्या मिरवणुकीसाठीही ठिकठिकाणी गर्दी होत असते. यामुळेच हे दोन सण एकत्र येऊ नये आणि पोलिसांवरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने हा बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.