मुंबई : राज्यात आढळलेल्या मंकीपॉक्सच्या दहा संशयित रुग्णांपैकी आठ जणांना या आजाराची बाधा झालेली नाही, असे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. उर्वरित दोघांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या नागरिकांच्या मुंबई विमानतळावर तपासण्या करण्यात येत आहेत. तसेच खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांना मंकीपॉक्सचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांची माहिती देण्याची सूचना मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. मुंबईत आतापर्यंत दोन संशयित रुग्ण आढळले होते. यातील एका रुग्ण परदेशातून आला होता, तर दुसऱ्या रुग्णाला प्रवासाची पार्श्वभूमी नाही. दोन्ही रुग्ण खासगी डॉक्टरांनी संशयित म्हणून पाठविले होते. दोन्ही रुग्णांच्या मंकीपॉक्सच्या चाचण्या करण्यात आल्या. त्या दोन्ही रुग्णांना मंकीपॉक्सची बाधा झालेली नाही, असे तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे. या रुग्णांना मंकीपॉक्ससदृश्य लक्षणे होती. परंतु एका रुग्णाला कांजण्या आल्याचे तपासणीत आढळले. दुसरा रुग्ण लहान मुलगा असून त्याचा हात, तोंड आणि पायाला संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

मुंबईसह राज्यभरात आतापर्यत दहा संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी आठजणांचे अहवाल आले असून त्यांना मंकीपॉक्सची बाधा झालेली नाही, असे आढळले आहे. दोन जणांचे अहवाल अजून आलेले नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पाहा व्हिडीओ –

मुंबईतही चाचण्या सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेतही आता मंकीपॉक्सच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने चाचण्यांसाठी आवश्यक संच पुरविले आहेत. मुंबईत आढळलेल्या दोन रुग्णांपैकी एका रुग्णाची बुधवारी कस्तुरबामध्ये चाचणी करण्यात आली, असे डॉ. गोमारे यांनी सांगितले. त्यामुळे आता राज्यात पुण्यासह मुंबईतही मंकीपॉक्सच्या चाचण्या उपलब्ध झालेल्या आहेत.