Eknath Shinde : मुंबईतल्या वडाळा ते भक्ती पार्क या मार्गावर प्रवासी मोनो रेलमध्ये अडकून पडल्याची घटना समोर आली. सुमारे दोन तास मोनो रेलमध्ये प्रवासी अडकून पडले होते. त्या ठिकाणी अग्निशमन दल, क्रेन हे सगळं बोलवण्यात आलं आणि मोनो रेलची काच फोडून प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. भक्ती पार्कच्या मैसूर कॉलनी या ठिकाणी ही घटना घडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोनोमध्ये अडकलेल्या प्रवाशांसह संवाद साधला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“तुम्ही कुणीही घाबरु नका, अग्निशमन दलाचे अधिकारी पोहचले आहेत. यंत्रणा पोहचली आहे. तुम्ही काळजी करु नका, घाबरु नका. एक दुसऱ्याला तुम्ही धीर द्या. सगळी यंत्रणा तुम्हाला खाली उतरवण्यासाठी आली आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. शांतपणे सगळे नीट व्यवस्थित बाहेर या.” असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं.

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी मोनो रेलमध्ये बसल्याने मोनो बंद पडली असावी, असा अंदाज-एकनाथ शिंदे

हार्बर लाइन बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांनी मोनो रेलकडे वळले. मोनोची क्षमता मेट्रोच्या तुलनेत कमी असते. मोनो रेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली आणि मोनो रेल एका बाजूला टिल्ट झाली. त्यामुळे वीज पुरवठा बंद झाला. करंट पास करणारा कनेक्टर डिस्कनेक्ट झाला आणि मोनो बंद पडली. तांत्रिक बिघाड कशामुळे झाला? चूक कुणाची झाली? हे सगळं नंतर तपासता येईल. पण त्या ठिकाणी आपण बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका आयुक्तांशी माझं बोलणं झालं आहे. रुग्णवाहिका आणि इतर टीमही यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे. मी आत्ता एका प्रवाशाशी संवादही साधला. मोनो रेलमध्ये अडकल्यामुळे ते जरा घाबरले आहेत. आमची लवकर सुटका करा हे मला त्यांनी सांगितलं. मी त्यांना सगळ्यांना धीर दिला आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी संवाद साधला. सगळ्या प्रवाशांना घरापर्यंत सोडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?

काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल. सर्वांनी संयम ठेवावा, ही माझी सर्वांना विनंती आहे. मी एमएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे. हा प्रकार का घडला, याचीही चौकशी करण्यात येईल.

घटनास्थळी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासह वैद्यकीय पथक देखील दाखल झालं होतं. तसेच जवळच्या महानगरपालिका रुग्णालयालाही सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे ही मोनोरेल बंद पडल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे.