मुंबई: गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत धाव घेतल्याने तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत असतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत जाऊन गुरुपौर्णिमेनिमित्त अमित शहा यांचे पाय धुतले, चंदन लावले. भाजपमध्ये गट विलीन करतो आता मला मुख्यमंत्री करा, असे साकडे घातले, अशी उपरोधिक टीका शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी विचारले असता एकनाथ शिंदे यांचा गट हा ज्यांनी निर्माण केला त्यांचा आदेश त्यांना पाळावाच लागतो. ते शिवसेनाप्रमुखांच्या समाधीस्थळी कौल लावत नाहीत. १०० टक्के दिल्लीला जाणार हा कार्यक्रम ठरलेला होता, असे संजय राऊत म्हणाले. त्यांनी गुरूपौर्णिमेचे फुले, पूजा-अर्चेचे सर्व सामान त्यांच्या विमानातून नेले होते. त्यांनी अमित शहांची पूजा अर्चा केली ती गुरू म्हणून. त्यांच्या चरणांवर डोके ठेवले. पायांवर चाफ्याची फुले वाहिली, चंदन लावले, असा दावा त्यांनी केला.
पूजा पार पडल्यावर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली. ते आमची कोंडी करतात, काम करू देत नाहीत. आम्हाला अडचणीत आणतात, आमच्या आमदारांच्या चौकशा लावतात, असेही सांगितले. महाराष्ट्रात मराठी माणसांची एकजूट झाली असून त्याचा अधिकाधिक त्रास आम्हाला होईल.
त्यामुळे तुम्ही लक्ष घाला अन्यथा आमचे राजकीयदृष्ट्या मोठे नुकसान होईल, असे त्यांनी अमित शहांना सांगितले. यावर शहांनी शिंदेंना त्यांच्या मनात नेमके काय आहे हे विचारले असता आपल्याला मुख्यमंत्री करा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला स्थैर्य येईल असे शिंदेंनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला.
विलीनीकरणाची तयारी
शिंदेंनी अमित शहांकडे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरला असता मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे त्यांनी निक्षून सांगितले. तेव्हा मी माझ्या गटासह भाजपमध्ये विलीन व्हायला तयार आहे. मला मुख्यमंत्री करा, असे शिंदे पुन्हा म्हणाले. याआधीही वारंवार त्यांनी ही मागणी केली असल्याचे सांगतानाच शिंदे खूप हातघाईवर आले आहेत. असा नेता पाहिला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. आपण जे बोलत आहोत ते १०० टक्के सत्य असून तसे नसल्यास एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी प्रतिवाद करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या घडामोडी
शिंदे यांच्या काही लोकांवर भविष्यात नक्कीच कारवाया होणार आहेत. त्या प्रकारचे अस्सल पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. यापुढे त्यांना वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीत मला कमी होताना दिसत आहेत. आयकर खात्याची नोटीस हा फक्त इशारा आहे. यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घडतील असे भाकीत संजय राऊत यांनी केले.