केंद्राची मान्यता; राजपत्रात प्रसिद्ध करून तातडीने नामबदल

मुंबईतील ‘एल्फिन्स्टन रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’, तर ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ रेल्वे स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे करण्यास केंद्रीय गृहविभागाने मान्यता दिल्याचे कळविले आहे. राज्य शासनाने या दोन्ही स्थानकांची सुधारित नावे इंग्रजी व देवनागरी लिपीत राजपत्रात प्रसिद्ध करून त्याप्रमाणे नावांमध्ये बदल करावेत, असे केंद्रीय गृहविभागाने कळविले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून यासाठी आपण करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोन्ही स्थानकांच्या नावामध्ये बदल व्हावेत, ही समस्त मुंबईकरांची तसेच राज्यातील जनतेची भावना होती. यासाठी मी १९९१ पासून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे रावते यांनी सांगितले. राज्यात पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज्य व केंद्राकडे आपण याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. यानंतर अखेर २६ वर्षांच्या या पाठपुराव्यास यश आले असून आता ‘एल्फिन्स्टन रोड’सह छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या नामबदलास केंद्राने मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण करून या दोन्ही स्थानकांच्या नावामध्ये तातडीने बदल करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.