मुंबई : अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक) पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी ३१ जुलै जाहीर होणार आहे. या यादीत अर्ज केलेल्या तब्बल २ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक) पदवी प्रवेशासाठी यंदा २ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी विक्रमी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना गेल्या दोन दिवसात पसंतीक्रम भरण्याची संधी दिली होती.
या कालावधीत १ लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी सायंकाळी ८ पर्यंत पसंतीक्रम अर्ज भरले आहेत. यंदा प्रवेश नियमावलीत बदल असून पहिल्या तीन पर्याय असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांची ३१ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा मागणी असलेल्या अभ्यासक्रमांच्या जागांमध्येही वाढ झाली आहे. त्या तुलनेत अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यावर्षी सीईटी आणि नोंदणी प्रक्रियेत बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही अर्ज वाढण्याची शक्यता आहे. गेल्या सात वर्षाच्या तुलनेत अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी विक्रमी प्रवेश झाले होते. यंदाही नोंदणी वाढली आहे.
असे आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पहिली फेरी ३१ जुलै रोजी जाहीर होणार असून, या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १ ते ३ ऑगस्ट दरम्यान दुपारी ३ पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचे आहेत. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी ४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत पसंतीक्रम भरता येणार आहे. तसेच दुसरी गुणवत्ता यादी ११ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.