मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलानंतर शुक्रवारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) अभियांत्रिकीबरोबर एमबीएच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी २८ जूनपासून प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करता येणार आहे. दोन्ही अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी १२ जुलै रोजी, तर १७ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

सीईटी कक्षाने यंदा अभियांत्रिकी आणि एमबीए अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा एप्रिल महिन्यातच घेतली होती. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ९ ते १७ एप्रिल या कालावधीत सीईटी घेण्यात आली. ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तसेच एमबीएसाठीची सीईटी १ ते ३ एप्रिल रोजी सहा सत्रांमध्ये झाली. एमबीए सीईटीसाठी राज्यभरातून १ लाख ५७ हजार २८१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील १ लाख २९ हजार १३१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. एमएचटी सीईटी पीसीएम ग्रुपचा निकाल १६ जून रोजी, तर एमबीए सीईटीचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. त्यानुसार सीईटी कक्षाने शुक्रवारी सांयकाळी दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार दोन्ही अभ्यासक्रमांसाठी २८ जून ते ८ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी १२०० रुपये शुल्क असेल, तर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येईल. ३० जून ते ९ जुलै या काळात कागदपत्रांची आणि अर्जांची पडताळणीही होणार आहे. त्यानंतर १२ जुलै रोजी दोन्ही अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर या गुणवत्ता यादीवर हरकती आणि आक्षेप नोंदवण्यासाठी १३ ते १५ जुलैची मुदत देण्यात आली आहे. अंतिम गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी जाहीर होणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम व अभ्यासक्रमांची पसंती भरण्यासाठी वेळ दिला जाईल. त्याचे व पुढील कॅप फेऱ्यांचे वेळापत्रक सीईटी कक्ष नंतर जाहीर करणार आहे.

असे असेल वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज नोंदणी – २८ जून ते ८ जुलै

कागदपत्रे पडताळणी – ३० जून ते ९ जुलै

तात्पुरती गुणवत्ता यादी – १२ जुलै

हरकती व आक्षेप नोंदणी – १३ ते १५ जुलै

अंतिम गुणवत्ता यादी – १७ जुलै

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.