अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि अन्य अभ्यासक्रमांसाठी राज्य प्रवेश नियमन प्राधिकरणातर्फे घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहे.

ही परीक्षा दोन टप्प्यांत होत असून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) या विषय गटाची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या विषय गटाची परीक्षा १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील ४ लाख ३२ हजार १० तर परराज्यातील १९ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

राज्यातील सर्वाधिक (४० हजार ६६१) विद्यार्थी पुणे जिल्ह्य़ातील आहेत. त्या खालोखाल मुंबई (२५ हजार ४१७), नगर (२५ हजार २८७), नाशिक (२२ हजार ६०७), नागपूर (२२ हजार ५५६), ठाणे (२३ हजार १२०) या जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बाहेरील अर्जामध्ये सर्वाधिक अर्ज मध्य प्रदेशातील विद्यार्थ्यांचे आहेत. राज्यात यंदा तालुका स्तरावर परीक्षा केंद्र आहेत.