एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते भाजपा आणि शिवसेनेत जोरदार प्रवेश करणार असताना भाजपाच्या माजी आमदाराने नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नाशिक जिल्हयातील भाजपाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी जयंत पाटील यांनी माणिकराव कोकाटे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार असतील अशी घोषणा केली. यावेळी पैठणचे भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष दत्तात्रय कोरडे, भानुदास पिसे, अप्पासाहेब गायकवाड यांनीही जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार,आमदार किरण पावसकर, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे यावेळी उपस्थित होते.
“पूर्ण राष्ट्रवादीचे संघटन तुमच्यासोबत आहे. विधानसभा निवडणुकीत सिन्नर ही जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायची आहे,” असे आवाहन यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यावेळी केले. “राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी छगन भुजबळ यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार,” असल्याची ग्वाही कोकाटे यांनी यावेळी दिली. तसेच आदरणीय शरद पवार साहेबांनी राज्यभर सुरू केलेल्या झंझावातात सहभागी होणार आणि नाशिकमध्ये राष्ट्रवादी अधिक ताकदवान करणार, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.