मुंबई : ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर गेल्याच्या छगन भुजबळ यांच्या दाव्यावरून केंद्रीय यंत्रणांचा सत्ताधारी भाजपकडून दुरुपयोग केला जात असल्याच्या आरोपाला पुष्टीच मिळाल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. असे काही वक्तव्य केल्याचा इन्कार करीत भुजबळांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपबरोबर गेल्याचा दावा केला.

ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर गेल्याचा भुजबळांच्या दाव्याबाबत ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. भुजबळांच्या विधानाचा हवाला घेत विरोधकांनी भाजपवर केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप केला. अजित पवार यांनाही भुजबळांचे समर्थन करावे लागले. निवडणुकीच्या तोंडावर चुकीचे कथानक रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा >>>साखर उद्योग आर्थिक संकटात ? राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्राकडे केल्या विविध मागण्या

विरोधी नेत्यांच्या विरोधाती ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप आम्ही आधीपासून करीत होतो. भुजबळांच्या दाव्याने या आरोपाला पुष्टीच मिळाल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. भुजबळांचे वक्तव्य १०० टक्के खरे आहे. विरोधी नेत्यांवर दबाव वाढविण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छगन भुजबळ यांनी मात्र आपण अशी कोणतीही मुलाखत दिली नसल्याचे स्पष्ट केले. ईडीपासून मुक्तीसाठी नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता, असे भुजबळ म्हणाले. ही भूमिका अजित पवार यांनी तेव्हाच मांडल्याकडे लक्ष वेधले.