बाळासाहेबांचा विजय असो.. आवाज कोणाचा शिवसेनेचा.. अशा उत्साही घोषणा देत शिव येथील सोमय्या मैदानात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक सकाळपासूनच गर्दी करू लागले होते. हळूहळू वातावरण भारावले गेले. उद्धव यांचे आगमन होताच मुठी आवळून पुन्हा एकदा जयघोष झाला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील जुनीच ध्वनिचित्रफीत ऐकत जमलेल्या हजारो शिवसैनिकांनी शिवबंधनाचा गंडा बांधला.. विराट गर्दीची सांगता मात्र छोटय़ा गर्जनेनेच झाली.. दरम्यान, संपूर्ण भाषणात उद्धव यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता मोदींनी वांद्रे येथील सभेत शिवसेना व बाळासाहेबांच्या केलेल्या अनुल्लेखाची परतफेड केली.
नरेंद्र मोदी यांच्या वांद्रे येथे झालेल्या जाहीर सभेपेक्षाही मोठी गर्दी जमवून शिवसेनेने गुरुवारी गर्दीचे प्रदर्शन केले. सभेच्या सुरुवातीलाच शिवसैनिक व नेत्यांना शिवबंधनाच्या धाग्यात बांधण्यात आले. टाळ्यांच्या गजरात उद्धव यांच्या भाषणाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका करत उद्धव यांनी २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर काँग्रेसच्या पंतप्रधानांचे अखेरचे भाषण असेल, पुढच्या प्रजासत्ताकदिनी महायुतीचाच पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करेल असे स्पष्ट केले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारखा दुबळा पंतप्रधान यापूर्वी कधी झाला नाही, त्याना देशात, परदेशातच नव्हे, तर पक्षातही काडीची किंमत नाही, अशी टीका उद्धव यांनी केली. देशावर घराणेशाही लादणाऱ्या काँग्रेसचे दिवस आता भरले असून सोनिया गांधी व आता राहुल गांधी ही घराणेशाही यापुढे चालणार नाही. काँग्रेसने कायम जातीपतीचे राजकारण करून तोडा व फोडा नीतीचा अवलंब करून देशावर राज्य केले असा टोला उद्धव यांनी हाणला.

पवारांवरही वार
केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही उद्धव यांनी तोंडसुख घेतले. पवारांमध्ये सरकारबाहेर पडण्याची हिंमत नसल्याचे ते म्हणाले. तशी हिंमत दाखवल्यास काँग्रेसवाले त्यंना तुरुंगाचा रस्ता दाखवतील अशी टीका उद्धव यांनी केली.

जुनीच शपथ नव्याने
शिवसेनाप्रमुखांनी यापूर्वी शिवसैनिकांना दिलेल्या शपथेची ध्वनिचित्रफीत उपस्थित दाखवण्यात आली, आणि तीच शपथ पुन्हा देण्यात आली. त्यानंतर उद्धव यांनी महायुतीची व हिंदुत्वाची कास धरण्याची शपथ उपस्थित शिवसैनिकांना दिली.

हिंदुत्वाचाही गजर
हिंदुत्वाच्या मुद्दय़ालाही उद्धव यांनी हात घातला. निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्वाच्या नावाने बोटे मोडत केवळ मुसलमानांना कुरवाळण्याचेच काम काँग्रेसकडून केले जाते असे निदर्शनास आणून देत उद्धव यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागली. हे शिंदे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुसलमानांना तुरुगात डांबण्यापूर्वी दहावेळा विचार करण्याचा सल्ला देतात. निष्पाप मुसलमानांना तुरुंगात डांबू नका असे सांगतात. खरेतर कोणत्याच निष्पाप लोकांना तुरुंगात डांबू नका असे आमचे म्हणणे आहे परंतु काँग्रेसवाले निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जातीपातीत फूट पाडण्याचे काम करतात असे सांगत खरे धर्माध काँग्रेसच असल्याचे उद्धव म्हणाले. खुनाच्या आरोपावरून शंकराचार्याना अटक होते. अन्य धर्मगुरूंबाबत अशी िहमत शिंदे यांनी केली असती काय असा सवाल करत उद्धव यांनी हिंदूंच्या मुळावर येणाऱ्या कायद्याच्या चिंधडय़ा करण्याचा इशारा दिला.

शिवसेनाप्रमुखांनी यापूर्वीच काँग्रेसला गाडले नाही तर देशात अराजक माजेल असा इशारा दिला आहे. येणारी लोकसभा निवडणूक ही शेवटची आशा असून काँग्रेसचा पाडाव करण्यासाठी सर्व शक्तिनीशी कामाला लागा
उद्धव ठाकरे</strong>