मुंबई : राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून वादंग पेटला आहे. अनेक ठिकाणी मराठी भाषेला डावलण्यात येत असल्याचेही प्रकारही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी ‘म’ मोबाईलचा सोडून ‘म’ मराठीचा गिरवण्याच्या उद्देशाने दादरमधील साने गुरुजी इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘आज्जी बाई जोरात’ या मराठी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. माटुंगा रोड (पश्चिम) येथील यशवंत नाट्यमंदिर येथे रविवार, ६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता नाट्यप्रयोग रंगणार आहे.
जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित व क्षितीज पटवर्धन लिखित – दिग्दर्शित ‘आज्जी बाई जोरात’ हे मराठीतील पहिले ‘एआय’ महाबालनाट्य आहे. विशेष बाब म्हणजे ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसिद्ध अभिनेते दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आवाजात नाटकाची उद्घोषणा देण्यात आली आहे. सध्याची पिढी मोबाईलच्या चौकटीत अडकली असून समाजमाध्यमांमध्ये गुंतलेली आहे. हेच जाणून लहान मुलांनी आभासी जगात न रमता आपले जुने पारंपारिक खेळ खेळावे, पुस्तके वाचावीत या उद्देशाने नाटकात आजी लहान होऊन स्वतःच्या नातवाला शिकवित आहे. या नाटकाला उन्हाळ्याच्या सुट्टीत उत्तम प्रतिसाद मिळाला असून विविध गोष्टी व इतर पुस्तकांचा खप सुद्धा वाढल्याची माहिती समोर आली आहे.
सध्याचे वातावरण पाहता ‘आज्जी बाई जोरात’ नाटकातील आजीने प्रत्येक शालेय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे, या उद्देशाने दादरमधील साने गुरुजी इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला असून भविष्यात इतर शाळांच्या विद्यार्थ्यांसाठीही नाट्यप्रयोग आयोजित करण्याचा मानस आहे. या नाट्यप्रयोगासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे.