scorecardresearch

मुंबई : अश्लील चित्रफितीच्या माध्यमातून व्यावसायिकाकडून चार लाखांची खंडणी

व्यावसायिकाच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी याप्रकरणी चार मोबाइल धारकांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Extortion businessman mumbai
मुंबई : अश्लील चित्रफितीच्या माध्यमातून व्यावसायिकाकडून चार लाखांची खंडणी (pic credit – indian express )

मुंबई : अश्लील चित्रफितीच्या माध्यमातून परळ येथील व्यावसायिकाकडून सुमारे चार लाख रुपये खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी याप्रकरणी चार मोबाइल धारकांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

परळ येथे वास्तव्यास असलेल्या ४० वर्षीय तक्रारदाराचा हार्डवेअर वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना ७ मार्च रोजी घरी असताना एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला. तो घेतल्यानंतर समोरील महिला अश्लील चाळे करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे व्यावसायिकाने त्या महिलेचा व्हिडीओ कॉल तात्काळ बंद केला. त्यानंतर व्यावसायिकाला एक संदेश आला. त्यात एक चित्रफीत पाठवण्यात आली होती. तक्रारदार महिलेचे अश्लील चाळे पाहत असल्याचे चित्रीकरण त्यात करण्यात आले होते. ती चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन तक्रारदारांकडे १३ हजार ५०० रुपयांची खंडणी मागण्यात आली. भीतीपोटी तक्रारदारांनी ती रक्कम आरोपी महिलेला पाठवली. त्यानंतर वारंवार पैशांची मागणी होऊ लागली. त्यामुळे तक्रारदारांनी तिचा क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या राम पांडे नावाच्या व्यक्तीचा त्यांनी दूरध्वनी घेतला. यूट्यूबवर तक्रारदारांचे अश्लील चित्रीकरण पाहिले असून त्याबाबत तक्रार आली असल्याचे त्याने सांगितले. तसेच ते चित्रीकरण यूट्यूबवरून काढण्यासाठी व्यावसायिकाकडे पैशांची मागणी करण्यात आली. तसेच यूट्यूबच्या हेल्पलाईनच्या नावाखालीही तक्रारदाराकडून रक्कम घेण्यात आली. त्यानंतर राम पांडे नावाच्या व्यक्तीने चित्रीकरण झालेल्या तरुणीने आत्महत्या केल्याचे सांगून व्यावसायिकाकडे पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी आपली फसवणूक होत असल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी भोईवाडा पोलिसांकडे तक्रार केली.

हेही वाचा – कोलकात्याला नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोघे अटकेत

हेही वाचा – मुंबई : पाच वर्षांच्या मुलावर लैगिक अत्याचार; दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल

व्यावसायिकाने आरोपींनी सांगितल्याप्रमाणे विविध बँक खात्यावर मिळून सुमारे तीन लाख ८६ हजार रुपये जमा केल्याचे तक्रारीमध्ये नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी सराईत टोळीचा सहभाग असल्याचा संशय असून पैसे जमा झालेल्या बँक खात्यांबाबत पोलिसांनी माहिती मागवली आहे. त्याद्वारे पुढे तपास करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 17:02 IST