मुंबई : वधू-वर सूचक संकेतस्थळावर बनावट प्रोफाइल तयार करून माझगाव येथील ३४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अश्लील चित्रीकरण केल्याचा प्रकार घडला आहे. या चित्रीकरणाद्वारे आरोपीने महिलेकडे खंडणीची मागणी केली. याप्रकरणी भायखळा पोलिासांनी खंडणी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणामागे फसवणूक करणाऱ्या सराईत सायबर टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
३४ वर्षीय तक्रारदार महिला माझगाव येथील रहिवासी असून नोकरी करतात. त्यांनी वधू-वर सूचक संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. तेथील प्रोफाईल पाहून त्यांना ९ ऑगस्टला एक दूरध्वनी आला होता. त्याने महिलेसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने तक्रारदार महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिच्याशी नियमित संपर्क साधण्यास सुरूवात केली. यावेळी आरोपीने व्हिडिओ कॉल करून महिलेला नग्न होण्यास सांगितले.
महिलेने नकार दिला असता आपण लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महिलेने आरोपीने सांगितल्याप्रमाणे केले. त्यानंतर आरोपीने त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर आरोपीने महिलेला धमकावण्यास सुरूवात केली. त्याने पीडित महिलेला तिचे चित्रीकरण पाठवून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास ते चित्रीकरण समाज माध्यमांवर वायरल करून महिलेची बदनामी करण्याची धमकी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने त्याला ३० हजार रुपये दिले, पण आरोपीने वारंवार रकमेची मागणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर आरोपीने महिलेला भेटवस्तू पाठवत असल्याचे भासवले. त्यावेळी सीमाशुल्क विभागातून दूरध्वनी करीत असल्याचे भासवूनही संबंधित व्यक्तीने महिलेकडे विविध शुल्कांच्या नावाने पैशांची मागणी केली होती.
हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी भायखळा पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून भायखळा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ३०८ (२), ३५१ (२) माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६७ (अ) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्याबाबत तपास सुरू आहे.