मुंबई : मालाडमधील मालवणी परिसरातून बेपत्ता झालेल्या नजीर सय्यद उर्फ फहीम मचमच याच्या हत्येचा उलगडा एका चित्रफितीमुळे झाला. भायखळा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून फहीम मचमचची हत्या केल्याचे या तिघांनी पोलीस चौकशीत कबूल केले.

मालाडच्या मालवणी येथे राहणारा नजीर सय्यद उर्फ फहीम मचमच (४३) १५ एप्रिलपासून बेपत्ता आहे. फहीमची हत्या मालवणी येथे राहणार्या तीन तरुणांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींनी फहीम मचमचला मारहाण करताना एक चित्रफित तयार केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरून एका नाल्यात टाकण्यात आला. हे तरूण मद्यपान करीत असताना त्यांनी ही चित्रफित आपल्या एका सहकार्याला दाखवली. दरम्यान, ही माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार हर्षल देशमुख यांना मिळाली.

पोलिसांनी संशयावरून मोहम्मद सैफ फैयाज शेख (२८), हाजीम खान ( १९) आणि सूरज ठाकूर (१९) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोबाइलची तपासणी केली असता फहीम मचमचला मारहाण करीत असल्याची चित्रफित आढळली. याप्रकरणी केलेल्या चौकशीत आरोपींनी फहीम मचमचची हत्या केल्याची कबुली दिली. या तिन्ही आरोपींना मालवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिली.

त्या रात्री नेमके काय झाले ?

फहीम मचमच १५ एप्रिल रोजी रात्री मित्र फयाझ शेखसोबत (५२) मद्यपान करीत होता. ते दोघे रात्री उशीरा फय्याझ शेखच्या घरी झोपायला गेले. त्यावेळी फय्याझ शेखची पत्नी आणि १५ वर्षांची मुलगी घरात होती. रात्री सर्वजण झोपले होते. त्यावेळी फहीम मचमचने १५ वर्षांच्या मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने हा प्रकार प्रियकर हाजीम खान (१९) याला सांगितला. यामुळे संतापलेला हाजीम पीडित मुलीचा भाऊ सैफ खान आणि त्यांचा मित्र सूरज ठाकूरला घेऊन आला. या तिघांनी फहीमला बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीची चित्रफीत तयार केली. मारहाणीत फहीमचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह एका गोणीत भरला आणि ती गोणी मीठ चौकीजवळील नाल्यात फेकून दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतदेहाचा अद्याप शोध नाही

नाल्यात टाकेलल्या मृतदेहाचा मालवणी पोलीस शोध घेत आहेत. दोन दिवस उलटूनही फहीम मचमचचा मृतदेह सापडलेला नाही. पालिकेने नाला साफ करून त्याचा गाळ वसईजवळील नायगाव येथे टाकला आहे. त्यामुळे आता पोलीस नायगाव परिसरात फहीमच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.