जेबीआयएमएस, वेलिंगकर, सिडनहॅममध्येही बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश
वैद्यकीय शिक्षण संस्थांपाठोपाठ आता जेबीआयएमएस, वेलिंगकर, सिडनहॅम अशा राज्यातील नामांकित व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्येही बोगस जात व जात वैधता प्रमाणपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांनी यंदाच्या, म्हणजे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खोटी प्रमाणपत्रे देऊन फसवणूक करणाऱ्या अशा चार विद्यार्थ्यांचे प्रवेश शुक्रवारी तंत्रशिक्षण संचालनालयाने रद्द केले.
बोगस जात आणि जात वैधता प्रमाणपत्रांच्या आधारे जेजे, कूपर, सायन आदी नामांकित महाविद्यालयांमधील अनुसूचित जमातींकरिता (एसटी) राखीव असलेल्या जागांवर तडवी, भिल्ल आदी आदिवासी जातींमधून असल्याचा दावा करीत गांधी, शहा, खान, रेशमवाला आदी खुल्या वर्गातील आडनावधारक विद्यार्थी कसा डल्ला मारत आहेत, यावर ‘लोकसत्ता’ सातत्याने प्रकाश टाकत आहे. याच्या परिणामदाखल वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने गेल्या चार वर्षांतील १९ विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द केले. या वर्षी प्रवेश झालेले वैद्यकीयचे पदवी आणि पदव्युत्तरचे जवळपास ३०० विद्यार्थी बोगस प्रमाणपत्रप्रकरणी चौकशीच्या फेर्यात आहेत. परंतु, बोगस प्रमाणपत्रांची ही कीड केवळ वैद्यकीयच नव्हे तर सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना लागल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (जेबीआयएमएस), सिडनहॅम इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एसआयएमएसआरईई), वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च या मुंबईतील नामांकित व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये दरवर्षी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक चढाओढ असते. जुलै महिन्यात या संस्थांबरोबरच एमबीए आणि एमएमएस या पदव्युत्तर व्यवस्थापन शिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया संपली. १ ऑगस्टपासून या संस्थातील सत्र सुरूही झाले. मात्र, वैद्यकीयप्रमाणेच या तीन शिक्षणसंस्थांमध्येही बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे १७ विद्यार्थ्यांनी एसटींसाठी राखीव असलेल्या कोटय़ातून प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या तंत्रशिक्षण संचालनालयाकडे याबाबत तक्रार आल्यानंतर संचालनालयाने या विद्यार्थ्यांच्या जात व जातवैधता प्रमाणपत्रांची सत्यता पडताळून पाहण्यास सुरुवात केली. त्यात सय्यद हमीद अन्सारी, राहुल करमचंद कांकरिया, चिंतामण किर्ती शहा आणि मिती शहा या चार विद्यार्थ्यांनी अनुसूचित जातीतून असल्याचा दावा करणारी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचे निष्पन्न झाले. यापैकी पहिले तीन विद्यार्थी सिडनहॅममध्ये प्रवेश घेण्यात यशस्वी झाले होते; तर चौथ्या विद्यार्थिनीने खोटय़ा प्रमाणपत्रांच्या आधारे वेलिंगकरमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, या चारही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत, असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन यांनी सांगितले.
आणखी १३ जणांची चौकशी
व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या आणखी १३ विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी चालू असून यापैकी पाच विद्यार्थी हे जेबीआयएमएसमधले आहेत. या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास आम्ही त्यांचे प्रवेश रद्द तर करूच. शिवाय त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाईही केली जाईल, असे सु. का. महाजन त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.