मुंबई : भारत आणि पाकिस्तानात सुरू असलेल्या ताणतणावात समाजमाध्यमांवर बनावट छायाचित्रे, चित्रफिती आणि पत्रके पसरविण्याचा धुमाकूळ सुरू आहे. मुंबई विद्यापीठाच्या नावानेही ‘युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव १४ मे २०२५ पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत’ असे नमूद करून परिपत्रक समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. मात्र परीक्षेसंदर्भातील संबंधित परिपत्रक बनावट असल्याचे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव १४ मे २०२५ पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत’ असा खोटा दावा करून आणि मुंबई विद्यापीठाच्या बोधचिन्हाचा वापर करून बनावट परिपत्रक समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आले आहे. मात्र सदर परिपत्रक हे संपूर्णतः बनावट असून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने कोणत्याही परीक्षा पुढे ढकललेल्या नाहीत. अधिकृत माहिती ही मुंबई विद्यापीठाच्या mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून वेळोवेळी कळविण्यात येईल. तसेच अधिकृत समाजमाध्यम खात्यावरूनही माहिती देण्यात येणार आहे.
दरम्यान, चुकीची माहिती पसरविणे हा दंडनीय गुन्हा आहे, खोट्या महितीला बळी पडू नका, सतर्क रहा, मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांना फॉलो करा आणि अधिकृत समाजमाध्यम खात्यांवरील माहितीवरच विश्वास ठेवा, असे आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर एक पोस्ट करीत केले आहे.
बनावट परिपत्रकात नेमके काय?
सर्व संबंधित प्राचार्य, परीक्षा नियंत्रक, विभागप्रमुख आणि विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले जाते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव १४ मे २०२५ पासून सुरू होणाऱ्या सर्व विद्यापीठ परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नवीन परीक्षेच्या तारखा परिस्थिती स्थिर झाल्यानंतर लवकरच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील. सर्व विद्यार्थ्यांनी आणि संबंधित शैक्षणिक अधिकाऱ्यांनी कृपया अधिकृत घोषणा येईपर्यंत संयम बाळगावा व चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असा संपूर्णतः खोटा मजकूर लिहिण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाची अधिकृत समाजमाध्यम खाती
• फेसबुक : @University of Mumbai
• इंस्टाग्राम : @uni_mumbai
• एक्स (पूर्वीचे ट्विटर) : @Uni_Mumbai
• यूट्यूब : @universityofmumbai_uom
• व्हॉट्सअप चॅनेल : @University of Mumbai