बनावट क्रेडिट कार्ड बनवून त्याद्वारे अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळीला दहिसर पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी या टोळीकडून २७४ क्रेडिट कार्ड्स, एक छपाई यंत्र आणि २६ राज्यांतील वाहन चालक परवाने जप्त केले.
बनावट क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक करण्यात येत असल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी कसून शोध घेतल्यानंतर या टोळीतील विश्वजीत छत्री व नितीन इंगळे या दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी पुणे येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी खालापूर टोलनाक्यावर करडी नजर ठेवली होती. विश्वजीत छत्री आणि नितीन इंगळे हे दोघे पळून जात होते. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सापडलेली क्रेडिट कार्ड बोगस असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले.