एकीकडे जातीचा बोगस दाखला सादर करून अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचे प्रकार उघडकीस येत असतानाच आता अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र देऊन मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमाला एका विद्यार्थिनीने प्रवेश घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अपंगत्वाचा खोटा दाखला देऊन विद्यार्थिनीने प्रवेश घेण्याचे हे पहिलेच उदाहरण असून सदर विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द करून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने सिडनहॅम कॉलेजला दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या वर्षी अभियांत्रिकी शाखेत जातीच्या बनावट दाखल्यांच्या आधारे एकूण १७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश संबंधित महाविद्यालयांना तंत्रशिक्षण संचालनालयाने दिले आहेत. यातील गंभीर बाब म्हणजे जातीच्या बनावट दाखल्याच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अजूनही संबंधित महाविद्यालयांनी गुन्हे दाखल केले आहेत अथवा नाही, याची कोणतीही माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडे नाही. काही तक्रारींच्या आधारे केलेल्या चौकशीमध्ये बनावट दाखल्यांची प्रकरणे जशी उघडकीस आली त्याचप्रमाणे रैना व्यास या विद्यार्थिनीने सिडनहॅम व्यवस्थापन महाविद्यालयात मास्टर्स इन मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला ‘लर्निग डिसेबिलिटी’चे प्रमाणपत्र सादर करून प्रवेश घेतला.

याबाबत तक्रार मिळाल्यानंतर पालिकेच्या ज्या शीव रुग्णालयातून सदर विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देण्यात आले तेथे चौकशी केली असता अपंगत्वाचे प्रमाणपत्र ज्या डॉक्टरांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे ते डॉ. एम. व्ही. कुलकर्णी हे २००८चे सेवानिवृत्त झाल्याचे दिसून आले. परिणामी अपंगत्वाचे रैना हिने सादर केलेले प्रमाणपत्रच बनावट असल्याचे स्पष्ट होऊन तिचा प्रवेश रद्द करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाने दिले तसेच तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासही सांगण्यात आले आहे.

अशा प्रकारे अपंगत्वाचा खोटा दाखला देऊन पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले हे पहिले प्रकरण उघडकीस आल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयातील सूत्रांनी सांगितले.

अपंगत्वाचेही खोटे प्रमाणपत्र दिले जाऊ शकते हे लक्षात घेऊन अपंगत्वाच्या प्रमाणपत्राच्या आधारे जेवढे प्रवेश देण्यात आले त्यांचीही छाननी केली जाईल, असेही या सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake disability certificate sydenham college student submitted
First published on: 09-09-2016 at 00:51 IST