मुंबई : भारतात मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या जीवनशैलीजन्य आजारांप्रमाणेच आता ‘फॅटी लिव्हर’ म्हणजेच यकृतातील चरबी साठण्याच्या समस्येनेही भयंकर रूप धारण केले आहे. विशेषतः मद्यपानाशिवाय होणाऱ्या नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजच प्रमाण देशात झपाट्याने वाढत असून हा आरोग्य क्षेत्रातील नवा धोका असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात बोलले जाते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या २०२४ च्या अभ्यासानुसार भारतातील प्रौढांपैकी सुमारे ३८ टक्के लोकांना फॅटी लिव्हरची लक्षणं दिसून येतात, जी जागतिक सरासरीपेक्षा अधिक असल्याचं नमूद करण्यात आल आहे.

ही परिस्थिती केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भारतातही पसरू लागली आहे. नॅशनल नॉन-कम्युनिकेबल डिजीज मॉनिटरिंग सर्व्हे २०२३-२४ नुसार महानगरांमध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण ४१ टक्क्यांपर्यंत असून ग्रामीण भागांमध्येही ते ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जीवनशैलीतील मोठे बदल, फास्ट फुडचा वाढता वापर, व्यायामाचा अभाव आणि वाढता लठ्ठपणा ही या वाढीमागची मुख्य कारण असल्याच वैद्यकीय तज्ज्ञ स्पष्ट करतात.

या आजाराचा सर्वात चिंताजनक पैलू म्हणजे तो २५ ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये झपाट्याने वाढत आहे. ठाणे येथील डॉ पराग देशपांडे यांच्या मते, आधी लिव्हर रोग म्हणजे मद्यपान करणाऱ्यांपुरता मर्यादित असे समजल जात होत, पण आज लठ्ठपणा, साखरेचा अतिरेक, जंक फूड, आणि सतत बसून राहण्याचा दिनक्रम या गोष्टी नव्या पिढीच्या लिव्हरला अपाय करत आहेत. आयसीएमआर व एम्स दिल्ली यांनी २०२४ मध्ये सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, फॅटी लिव्हर असलेल्या सुमारे १५ टक्के रुग्णांमध्ये पुढे जाऊन ‘नॉन-अल्कोहोलिक स्टिअटोहेपेटायटीस’ निर्माण होतो. ही स्थिती यकृताच्या जळजळीला कारणीभूत ठरते आणि कालांतराने फाइब्रोसिस, सिरोसिस आणि अगदी लिव्हर कॅन्सरपर्यंत रुग्ण पोहोचतो.

ग्रामीण भागातही वाढ

फॅटी लिव्हर ही बहुधा लक्षणविरहित स्थिती असल्याने अनेकांना हा विकार खूप उशिरा कळतो. एएलटी, एन्झाइम टेस्ट्स, फाइब्रोस्कॅन व अल्ट्रासाउंडच्या आदी चाचण्यांच्या मदतीने याच निदान शक्य असल तरी ग्रामीण भागात ही तपासणी सहज उपलब्ध नसल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. भारतीय आरोग्य मंत्रालयाने याच्या गांभीर्याची दखल घेत २०२२ मध्ये नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएफएलडी) नियंत्रण कार्यक्रम हा राष्ट्रीय असंसर्गजन्य आजारांच्या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट केला आहे. तसेच ‘ फिट इंडिया मुव्हमेंट, इट राईट इंडिया व आयुश्मान भारत आरोग्यए मोहिमांद्वारे जनजागृती वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वजन कमी करणे, दररोज व्यायाम, संतुलित आहार, साखर आणि चरबीचे प्रमाण कमी करणे आणि नियमित तपासणी या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. तज्ज्ञांच मत आहे की, जर जनजागृतीचा अभाव आणि आळसलेली जीवनशैली अशीच राहिली, तर भारतात येत्या काही वर्षांत लिव्हरशी संबंधित गंभीर आरोग्य संकट ओढवू शकत.

आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, जर परिस्थिती नियंत्रणात आणली गेली नाही, तर २०३० पर्यंत भारतात किमान ५ कोटी लोकांना एनएएसएच किंवा सिरोसिसचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वेळेत निदान, जीवनशैलीतील बदल आणि शासनस्तरावर धोरणात्मक प्रयत्न करून हे आगामी काळातील संकट टाळणे गरजेचे आहे.