मुंबई : अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल घाटकोपरमधील मेसर्स खुशी ट्रेडिंग आणि धारावीतील किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (झेप्टो) या अन्न व्यवसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये धारावीमधील किरणकार्ट यांचा परवाना निलंबित करण्यात आला तर घाटकोपरमधील खुशी ट्रेडिंग यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
मुंबईतील धारावी येथील किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (झेप्टो) या अन्न व्यवासायिकाच्या परिसरात अन्न सुरक्षा अधिकारी राम बोडके यांनी अचानक तपासणी केली असता अन्न व्यवसाय परवाना आणि नोंदणी कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. या तपासणीत काही अन्नपदार्थांवर बुरशी लागल्याचे दिसत होते. साचलेल्या पाण्याजवळ उत्पादनांचा साठा, नियामक मानकांनुसार शीतगृहांचे तापमान राखले नव्हते, ओली आणि अस्वच्छ फरशी, अन्नपदार्थ अव्यवस्थित आणि अस्वच्छ पद्धतीने साठवले होते, काही अन्न पदार्थ हे थेट जमिनीवर ठेवले होते. त्याचप्रमाणे कालबाह्य झालेले अन्नपदार्थ चांगल्या अन्न पदार्थांसह ठेवल्याचे आढळले. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा आणि परवाना आणि नोंदणी नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त (अन्न) अनुपमा पाटील यांनी तात्काळ परवाना निलंबन कारवाई केली. तसेच सर्व नियमांची अमलबजावणी करेपर्यंत आणि परवाना प्राधिकरणाकडून मान्यता मिळेपर्यंत किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
धारावीप्रमाणे घाटकोपर पश्चिमेकडील कोजमाजिंजी इस्टेटमध्ये असलेल्या मेसर्स खुशी ट्रेडिंग येथे अचानक तपासणी केली असता त्यांच्याकडे एफएसएसएआयचा परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच परिसर अत्यंत अस्वच्छ होता. याव्यतिरिक्त, अन्न उत्पादने चुकीच्या ब्रँडिंगची आणि निकृष्ट दर्जाची होती. तसेच विविध दुकानांमधून कालबाह्य झालेले अन्नपदार्थ खरेदी करत असल्याचे उघडकीस आले. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी अभिनंदन रणदिवे यांनी २२ मे २०२५ रोजी मेसर्स खुशी ट्रेडिंग यांच्यावर कारवाई करत व्यवसाय थांबविण्याच्या सूचना दिल्या. मात्र २९ मे २०२५ रोजी अभिनंदन रणदिवे आणि अन्न सहाय्यक आयुक्त अनुपमा पाटील यांनी पुन्हा अचानक भेट दिली असता व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तसेच सर्व अन्न आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांना लागू असलेल्या नियमांचे पूर्णपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला असून नियम मोडल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.