मुंबई : चित्रपटसृष्टीतील अनेकांनी आपल्याला अपमानित केले, मात्र सूड उगवण्याचा आपला स्वभाव नाही. तसेच, आपल्याला अपमानित करणाऱ्यांविरुद्ध दावे दाखल करण्यापेक्षा आपला बचाव करण्यावर आपण लक्ष केंद्रित केले, असा दावा अभिनेत्री कंगना राणावत हिने अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयात केला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खोटी विधाने केल्याच्या आरोपाप्रकरणी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. याप्रकरणी, अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कंगना हिने आपली बाजू मांडली. बाहेरचा माणूस म्हणून आपल्याला चित्रपटसृष्टीतील छळवणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे सुशांत याने म्हटले होते. आपलीही चित्रपटसृष्टीकडून छळवणूक झाल्याची तक्रार मी केली होती. आपल्यालाही सिनेसृष्टीबाहेरील व्यक्ती म्हणून हिणवल्याचेही कंगनाने आपले म्हणणे मांडताना साक्ष न्यायालयाला सांगितले. चित्रपटसृष्टीतील या छळवणुकीला कंटाळून आत्महत्येचा विचार एका क्षणी आपल्याही मनात आला होता. त्यामुळे, सुशांत याच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर खूप वाईट वाटल्याचेही कंगना हिने सांगितले.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : ५० टक्के पदवीधरांचे मतदार अर्ज अपात्र

मुलाखतीत, अख्तर वगळता इतर कोणाबदद्लही आपण बोललो नाही. मुलाखतीत हेतुत: आपण त्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. मुलाखतीमध्ये बोलण्यामागचा हेतू हा चित्रपटसृष्टीबाहेरच्या लोकांसमोरील आव्हाने सर्वसामान्यांसमोर आणण्याचा आपला उद्देश होता. आपण अभिनेता हृतिक रोशनची माफी मागण्यास नकार दिल्याने २०१६ च्या बैठकीत अख्तर हे आपल्याला ओरडले होते. अख्तर यांच्या वागण्यामुळे आपण नैराश्यात गेलो होतो. आपण या सगळ्या प्रकाराला घाबरल्यामुळेच आपल्याविरोधात तक्रार दाखल झाल्याचेही कंगना हिने सांगितले.

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरातील ९४१ सदनिका, ३६१ भूखंडांची सोडत जाहीर, अर्ज विक्री-स्वीकृतीला सुरुवात

चित्रपटसृष्टीतील अनेकांनी आपल्याला अपमानित केले, मात्र सूड घेण्याचा आपला स्वभाव नाही आणि म्हणूनच अख्तर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याचे कंगना हिने न्यायालयाला सांगितले.