मुंबई : ‘ तुमचा तरी माझ्यावर कुठे विश्वास आहे,?, अशी मिश्कील टिप्पणी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उद्देशून गुरुवारी विधानसभेत केल्यावर एकच हशा पिकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक उभारणीचे काय झाले, असा सवाल रोहित पवार यांनी सरकारला केला.

हेही वाचा >>> भाजपची पहिली यादी आज? केंद्रीय निवडणूक समितीच्या मेगाबैठकीत विचारमंथन सुरूच

विधानसभेत लेखानुदानावर चर्चा सुरु असताना रोहित पवार हे सरकारवर टीकास्त्र सोडत भाषण करीत होते. तेव्हा त्यांच्या मुद्द्यांना सत्ताधारी पक्षातील आमदार व मंत्री आक्षेप घेत होते. रोहित पवार यांच्या एका प्रश्नावर भाजपच्या मनीषा चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले. तेव्हा जयंत पाटील उठून म्हणाले, रोहित पवार यांना आपली मते मांडण्याची मुभा आहे. अर्थमंत्र्यांनी त्यावर उत्तर देणे अपेक्षित होते. पण सत्ताधारी आमदारांचा अजित पवारांवर विश्वास विश्वास नसल्याने तेच रोहित पवारांच्या प्रत्येक मुद्द्याला अडवून उत्तरे देत आहेत का, असा सवाल पाटील यांनी केला. त्यावर अजित पवार यांनी ‘तुमचा तरी माझ्यावर कुठे विश्वास आहे,?’ अशी टिप्पणी केली.