मुंबई : भोकरदन येथील वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या सोयाबीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शिनी समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जिल्हा पणन अधिकाऱ्याला तत्काळ पदमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत केली.
विक्रम काळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत हस्तक्षेप करीत उपसभापती निलम गोऱ्हे यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्याला तत्काळ पदमुक्त करण्याची सूचना केली. ही सूचना मान्य करून रावल यांनी संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ पदमुक्त करीत असल्याचे जाहीर केले.
देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात महाराष्ट्रात यंदा विक्रमी ११.२१ लाख टन खरेदी झाली आहे. सोयाबीन उत्पादक ५.११ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर खरेदी पोटी ५,५०० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. ही सर्व खरेदी प्रक्रिया पारदर्शी झाली आहे. भोकरदन येथील वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या सोयाबीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
संस्थेने २,५१९ शेतकऱ्यांकडून ३९ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केली असून, १९ कोटी रुपये संबंधितांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. चौकशीत १९ शेतकऱ्यांच्या सात-बारावर सोयाबीन नव्हते, तरीही त्यांच्याकडून सोयाबीन खरेदी करण्यात आले. या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. या प्रकरणी भागवत सुदाम दौंड यांच्यासह नऊ जणांविरुद्द गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जिल्हा पणन अधिकाऱ्याला तत्काळ पदमुक्त करण्यात येईल, असेही रावल म्हणाले.