मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा घेण्यासाठी सर्वच महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केले आहेत. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (ठाकरे गट) या पक्षांनी विविध तारखांना मैदान देण्याची विनंती केली असून त्यामुळे लोकसभा निवडणूक काळात शिवाजी पार्कात सभांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका

शिवाजी पार्क आणि राजकीय सभा हे जुने नाते आहे. त्यातही दिवंगत शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबरोबरचे मैदानाचे नाते अधिक घट्ट आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्याने शिवाजी पार्क गाजविण्यासाठी दोन्ही पक्ष आतूर आहेत. या दोन पक्षांखेरीज आणखी तीन पक्षांनी मैदानावर सभेच्या परवानगीसाठी महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे अर्ज केले आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला असून तारखांबाबत तपशील देण्यास मात्र नकार दिला. सर्व अर्ज मंजुरीसाठी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येतील असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रचारसभांच्या गदारोळात ‘जाणता राजा’ या नाटयप्रयोगासाठीही अर्ज आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१७ मेवरून वादाची चिन्हे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचा ठाकरे गट आणि मनसेने एकाच दिवशी, म्हणजे १७ मे रोजी सभेसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता या तारखेला कुणाला परवानगी मिळणार यावरून वाद रंगण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे अन्य तारखांसाठीही पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. शिंदे गटाने १६, १९, २१ एप्रिल आणि ३, ५ व ७ मे या तारखांना सभा घेण्यासाठी अर्ज केला आहे. अजित पवार गटाने २२, २४, २७ एप्रिल तर भाजपने २३, २६, २८ एप्रिलला मैदान मिळावे, अशी विनंती केली आहे.