आक्षेपार्ह जाहिरातींवर अन्न व औषध प्रशासनाची नजर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : कर्करोग, एड्स, मधुमेह यासारख्या दुर्धर आजारांवर रामबाण उपाय असल्याचा दावा करत रेल्वे स्थानकांपासून मुंबई, ठाण्यातील मोठय़ा मॉलमध्ये आपली उत्पादने विक्रीसाठी मांडणाऱ्या आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने जोरदार मोहीम हाती घेतल्याने या मुद्दय़ावरून नवा वाद उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मोठे आजार आयुर्वेदिक औषधांनी बरे होतील, अशा जाहिराती या कंपन्यांकडून केल्या जात आहेत. अशा जाहिराती करण्यास कायद्याने मनाई असल्याचा प्रशासनाचा दावा असून त्यानुसार मोठय़ा उत्पादक तसेच विक्रेत्यांकडून लाखो रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहेत.

या उत्पादकांच्या ठाण्यातील काही गोदामांवरही छापे टाकण्यात आले आहेत. प्रशासनाने जप्त केलेल्या उत्पादनांमध्ये आवळा, दुधी रसाची उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. अलीकडच्या काळात काही आध्यात्मिक गुरूंनी अशाच जाहिराती करत आपली उत्पादने बाजारात आणली असताना अन्न व औषध प्रशासन या उत्पादनांविषयी कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

भारतात मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा आकडा मोठा असल्याने अलीकडच्या काळात या आजारावर रामबाण उपाय असल्याचे सांगत काही औषध कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिराती करताना आढळतात. मधुमेहाप्रमाणे उच्च रक्तदाब दमा, किडनीचे आजार, हृदयविकार, स्त्री-रोग यासारख्या आजारांसह कर्करोग, एड्स यासारख्या दुर्धर आजारांच्या उपायांबाबतही अशाच जाहिराती केल्या जात आहेत. देशभरात अग्रगण्य मानले जाणारे काही आयुर्वेदिक औषध उत्पादकही अशा जाहिराती करताना आढळून येत आहेत. तसेच सत्संग आणि अध्यात्माच्या नावाने औषध उत्पादनांचा बाजार मांडणाऱ्यांची संख्याही अलीकडच्या काळात लक्षणीय आहे.

रेल्वे स्थानकांपासून मोठय़ा मॉलपर्यंत सर्वत्र अशा प्रकारच्या औषधांची विक्री होताना दिसून येते. औषध व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ व नियम १९५५ अन्वये अशा प्रकारच्या जाहिराती करणे कायद्याने गुन्हा असून उत्पादकांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी अशी औषधे विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यावर छापे घालून ती जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध विभागाने सुरू केली आहे. कोकण परिक्षेत्रात यासाठी खास पथक नेमण्यात आले असून गेल्या काही दिवसात मोठय़ा प्रमाणावर अशा औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन कोकण विभागाचे साहाय्यक आयुक्त विराज पौनीकर यांनी दिली. ठाणे शहरात अशा आक्षेपार्ह जाहिराती असलेल्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून विवियाना मॉलमधील ‘एनरिच फूड प्रॉडक्ट्स’ या दुकानातून तब्बल साडेपाच लाखांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच ही औषधे तयार करणाऱ्या गोदामांवरही कारवाई केल्याचे पौनीकर यांनी सांगितले. यामध्ये जांभूळ, दुधी, आवळा, त्रिफळा रसा सारख्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यापैकी बहुतांश औषधे मधुमेहावर हमखास उपाय अशा जाहिराती करत विकली जात होती. या औषधांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सामान्य नागरिकांना औषधांकडे आकर्षित करण्यासाठी अनेक उत्पादक अशा प्रकारच्या जाहिराती करत असतात. व्याधिग्रस्त रुग्ण अशा जाहिरातींकडे अधिक ओढले जातात. अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे नागरिकांची दिशाभूल होते. त्यामुळे कोणतेही औषध विक्री करताना अशा प्रकारे व्याधींची किंवा आजारांची नावे लिहिणे कायद्याने गुन्हा असून त्यावर कारवाई करण्यात येईल.

– विराज पौनीकर, साहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोकण विभाग

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food and drug administration campaign against ayurvedic drug companies
First published on: 18-07-2018 at 02:55 IST