एकही प्रयोगशाळा नाही; कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळेही अडचणी
‘मेक इन इंडिया’अंतर्गत संपूर्ण कोकणात मोठय़ा प्रमाणात विविध उद्योग येणार आहेत. आजही कोकण पट्टय़ात धोकादायक रासायनिक, औषध निर्मिती, कॉस्मेटिक उद्योग मोठय़ा प्रमाणात असताना या उद्योगांचा दर्जा तसेच सुरक्षिततेची तपासणी करण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे ना पुरेसे अधिकारी आहेत ना वाहने आहेत. ठाण्यापासून सिंधुदुर्गपर्यंत पसरलेल्या या भागासाठी स्वतंत्र प्रयोगशाळाही नसल्यामुळे आवश्यक नमुन्यांची चाचणीही मुदतीत करता येत नाही. यातील गंभीर बाब म्हणजे नोकरभरती बंदीचा मोठा फटका या विभागाला बसत असून किमान ही बंदी या विभागाच्या कामाची जबाबदारी लक्षात घेता उठवली पाहिजे असे ‘एफडीए’च्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंत पसरलेल्या कोकण पट्टीमध्ये जसे अनेक रासायनिक कारखाने आहेत तसेच औषधनिर्मिती करणारे अनेक उद्योगही आहेत. अन्न विभागाअंतर्गत मोठय़ा प्रमाणात तपासणीची जबाबदारी असताना गेली काही वर्षे या संपूर्ण विभागासाठी सहआयुक्त (औषध) हे पदच भरण्यात आलेले नाही. याशिवाय सहाय्यक आयुक्त, औषध निरीक्षक, अन्न सुरक्षा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच अधीक्षकांसह चतुर्थ श्रेणीची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त असल्यामुळे काम करणे अवघड असल्याचे ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोकण विभागासाठी ‘एफडीए’कडे अवघी ३५ वाहने मंजूर असून प्रत्यक्षात केवळ १९ वाहने वापरात आहेत. किमान जुन्या गाडय़ा दुरुस्त करून द्याव्यात, ही मागणीही मान्य केली जात नसल्यामुळे समजा रत्नागिरीतील मंडणगड येथे विषबाधा झाल्यास तेथे पोहोचायचे कसे, असा अधिकाऱ्यांचा सवाल आहे.
रत्नागिरी ते मंडणगड हे पाच तासांचे अंतर असून अशीच परिस्थिती अन्य भागांतही आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सहाय्यक आयुक्त अन्न व औषध ही दोन्ही पदे भरलेली नाहीत.
खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खात्यासाठी नवीन आकृतीबंध तयार करण्याचे आदेश ‘एफडीए’चे आयुक्त हर्षदीप कांबळे यांना दिला आहे.
अवघा एकच औषध निरीक्षक असून येथे ४४९ किरकोळ व घाऊक औषध विक्रेते आहेत. याशिवाय औषधे व कॉस्मेटिकच्या १३ कंपन्या असून दोन रक्तपेढय़ा आहेत. या सर्वाची चौकशी करण्यासाठी अधिकारी व वाहन उपलब्ध करून देण्यात आले नाही. नोकर भरतीवरील बंदीने अडचणी अधिक आहेत.
ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत मिळून एकूण ४५१ अॅलोपथी औषध कंपन्या, १४५ आयुर्वेदिक औषध कंपन्या, १५८ कॉस्मेटिक कंपन्या ४० रक्तपेढय़ा आहेत. अन्न व औषध प्रशासनात केवळ ११२ पदे असून त्यातली ४६ पदे रिक्तच.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2016 रोजी प्रकाशित
अन्न व औषध प्रशासनाची कोकणात वाताहत
‘मेक इन इंडिया’अंतर्गत संपूर्ण कोकणात मोठय़ा प्रमाणात विविध उद्योग येणार आहेत.
Written by संदीप आचार्य

First published on: 25-02-2016 at 03:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food and drug administration do not have sufficient authority